हरीष पाटणे यांच्या वाढदिनी ‘भूमिशिल्प’ तर्फे ‘स्नेहनिकेतन’ मध्ये मिष्टान्न वाटप

जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक भूमिशिल्पच्या वतीने साताऱ्यातील करंजे येथे होली फॅमिली कॉन्व्हेंट स्कूल संचलित स्नेह निकेतन या विशेष मुलींचे एकात्मिक बालगृहांमध्ये मिष्टान्न वाटप कार्यक्रम संपन्न झाला.दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी श्री.पाटणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, प्रशासन, सहकार आदी विविध क्षेत्रातील नानाविध घटकांनी शुभेच्छांचा वर्षाव करून हरीष पाटणे यांच्यावर भरभरून स्नेह व्यक्त केला.

पत्रकारितेत पंचवीस वर्षांपासून सक्रिय असताना समाजाने आपणावर केलेल्या उदंड प्रेमामुळे आपण भारावल्याचे सांगून हरीष पाटणे यांनी ‘स्नेह निकेतन’मधील विशेष बालिकांसमवेत वाढदिवस साजरा करताना मनात कृतज्ञतेची भावना दाटून आल्याचे सांगितले. तसेच या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल पद्माकर सोळवंडे व सहकार्यांना धन्यवाद दिले. तसेच “दैनिक पुढारी” चे संस्थापक ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनी ‘स्नेहनिकेतन’मध्ये सामाजिक जाणीवेतून विशेष उपक्रम राबवणार असल्याचेही सांगितले. निसर्गाने या विशेष मुलांवर अन्याय केला असला तरी त्यांची जबाबदारी स्वीकारून होली फॅमिली संस्था करत असलेल्या कार्याबद्दल आधार वाटतो, असेही ते म्हणाले.

‘हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे….’ ही प्रार्थना सादर करून अभिष्टचिंतन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. ‘भूमिशिल्प’चे संपादक पद्माकर सोळवंडे यांनी प्रस्ताविकामध्ये कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला व पत्रकारितेबरोबरच समाजसेवेचा वसा जपणाऱ्या संपादकांचा वाढदिवस साजरा करताना समाजातील अनाथ, उपेक्षित बालकांना गोड घास देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

यावेळी ‘स्नेह निकेतन’च्या सिस्टर जेसी, सिस्टर लिलीसिया, सिस्टर दया, तसेच विशेष शिक्षिका सोनल चराटकर यांनी या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करून श्री.पाटणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

हरीष पाटणे यांच्या सर्वांग सुंदर लेखणीविषयी ऐकले आणि वाचले होते, मात्र आज त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला आणि अनाथ बालकांसोबत त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाढदिवस साजरा करण्याच्या रूपाने जपलेली समाजसेवा वंदनीय असल्याचे सांगितले.

इतिहास अभ्यासक व पत्रकार गुरुदास अडागळे यांनी त्यांच्या भाषणात श्री. पाटणे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेतला.जयंत लंगडे यांनी आभार मानून स्नेहनिकेतन या संस्थेतील विशेष मुलांसमवेत श्री. पाटणे यांचा वाढदिवस साजरा केल्याचे समाधान वाटते असे सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील तमाम पत्रकारांनी श्री.पाटणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून तसेच सामाजिक उपक्रम राबविले. यावेळी जिल्हा पत्रकार संघ, दैनिक पुढारी, पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हरीष पाटणे यांनी केलेल्या कार्याचा विविध वक्त्यांनी त्यांच्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. तसेच जिल्हा पत्रकार भवनाची उभारणी करून पत्रकारांसाठी त्यांनी केलेले कार्य बहुमोल असल्याचे आवर्जून सांगितले.

स्नेहनिकेतन येथे झालेल्या कार्यक्रमास उत्सवमूर्ती हरीष पाटणे, पुढारीचे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, भूमिशिल्पचे संपादक पद्माकर सोळवंडे, पत्रकार जयंत लंगडे, गुरुदास अडागळे, प्रकाश शिंदे, साई सावंत, रणजित नलावडे, उद्योजक अतुल पटेल, अजित साळुंखे, प्रमोद इंगळे,ॲड. गणेश चोरगे, विक्रम आवळे, वैभव हादगे, विठ्ठल हेंद्रे, शैलेश पाटोळे, रवी काळे,महेश पाटोळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

error: Content is protected !!