लोकशाहीचा उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात बुधवारी दिनांक २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवरील सर्व तयारी पूर्ण झाली असून शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. दरम्यान, सेक्टर ऑफीसर ४३६, केंद्राध्यक्ष ३,९५६ व इतर कर्मचारी ११,८६९ असे एकूण १६,२६१ कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आल्याचे सोमवारी श्री. डूडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोमवारी संध्याकाळी पाच वाजता निवडणुकीसाठीचा प्रचार संपुष्टात आला आहे. त्यामुळे या मुदतीनंतर आचार संहिता भंग होईल, अशा प्रकारचे कोणतेही गैरकृत्य कोणाकडूनही घडल्यास संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करणेत येईल, असे सांगून जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले की,निवडणूक आचारसंहीता भंग होण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील भागात विशेष पथके नेमणेत आलेली आहेत. त्यानुसार cVIGIL या ॲपवर आजपर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण १०७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्व तक्रारी निकाली काढल्या आहेत. तसेच १९५० या नंबरवर एकूण ११ तक्रारी दाखल झाल्या असून सद्यस्थितीत त्या सुद्धा सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर आचारसंहिता काळात एकूण ११ गुन्हे दाखल झालेले आहेत. तर आचारसंहिता भंगविषयक प्राप्त तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करणेबाबत सर्व संबंधितांना सूचना दिल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात दारु, पैशाचा गैरवापर व मतदारांवर दबाब तंत्राचा वापर करणाऱ्या उमेदवार, व्यक्तीवर कारवाई करणेसाठी चेक पोस्ट तयार करण्यात आले आहेत. तेथे नियुक्त केलेले कर्मचारी व्यवस्थीत काम करत आहेत किंवा नाही? तसेच एफ.एफ.टी व एस.एस.टी पथकात नेमलेले कर्मचारी व्यवस्थित कामकाज करीत आहे किवा नाही? यांची तपासणी करणेबाबत व सर्व चेक पोस्टला भेटी देवून आचारसंहीतेच्या भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या सर्व निवडणुक निर्णय अधिकारी व संबंधित पोलीस अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. कोणीही लोकप्रतिनिधी अगर राजकीय पदाधिकारी शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना दबाव आणत असतील तर संबंधितांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचेशी याबाबत तत्काळ संपर्क साधणेबाबत निर्देश दिल्याची माहितीही श्री. डूडी यांनी यावेळी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात जप्ती पथकाअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, फलटण, कोरेगाव, माण – खटाव,वाई – खंडाळा , पाटण या विधानसभेच्या मतदार संघात एकूण तेरा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी ३,०९७ पोलिस कॉन्स्टेबल तसेच २९४० होमगार्ड यांची नेमणूक करणेत आली आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या आठ कंपनी व राज्य राखीव दलाची एक कंपनी यांची नेमणूक केलेली आहे.मतदान केंद्रांवर पुरेसा कर्मचारी वर्ग पुरविणेत येत असून यामध्ये सेक्टर ऑफीसर ४३६, केंद्राध्यक्ष ३,९५६ व इतर कर्मचारी ११,८६९ असे एकूण १६,२६१ कर्मचारी यांची नेमणूक करणेत आलेली आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करु नये, अशी बाब निदर्शनास आल्यास संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेवर कडक कारवाई करण्यात येईल.मतदान केंद्रावर स्वच्छता अभियान राबविणेबाबत सर्व निवडणुक अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या मतदान केंद्रामध्ये स्वच्छता अभियान राबविणेबाबत कार्यवाही करावी अशा सूचनाही दिल्या आहेत.
ज्येष्ठांसह दिव्यांगानी बजावला हक्क
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नोंदणी झालेले वय वर्ष ८५ च्या वरील एकूण १,९७४ मतदार असून त्यापैकी १७८७ मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे.तसेच दिव्यांग मतदार एकूण ३२३ असून त्यापैकी ३११ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. उर्वरित मतदार हे समक्ष केंद्रावर जाऊन मतदान करणार आहेत.
पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.