आयजीच्या जिवावर बायजी उदार !
बळीराजाच्या घामाच्या पैशांवर जिल्हा बँक संचालकांचा युरोप दौरा ; परतल्यावर संचालकांची परीक्षा घेणार, सोनू साबळेंचा इशारा
सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक अभ्यास नावाखाली युरोप दौऱ्यावर पर्यटनासाठी गेले आहेत. शेतकऱ्यांच्या घामाच्या कोट्यवधी रुपयांची सरळ सरळ उधळपट्टी असून दौऱ्यावरून परत येताच संचालकांनी नेमका कोणता अभ्यास केला, ह्याची परीक्षा शेतकऱ्यांसमोर द्यावी अन्यथा ज्याप्रमाणे शेतकऱ्याच्या सात बाऱ्यावर बँक बोजा चढवते तसाच युरोप दौऱ्याचा कोट्यवधी रुपये खर्चाचा बोजा दौऱ्यावर गेलेल्या १६ संचालकांच्या संपत्तीवर चढवण्यात यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी केली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशात नावाजलेली बँक असल्याचा डंका वाजवते. मात्र पडद्या आड चाललेले कारभार आता चव्हाट्यावर यायला लागले आहेत. नोट बंदी काळात केलेल्या व्यवहार, जरंडेश्वर कारखाना खरेदीसाठी केलेला कर्जपुरवठा यावरून अगोदरच केंद्रीय तपास यंत्रणांच्या नोटिसा बँकेला आले आहेत. तसेच बँकेच्या संचालकांच्या मीटिंग नाश्तावर वर्षाला लाखो रुपये खर्च होत असण्याबरोबरच नोकरभरती तसेच इतर खरेदी यंत्रणेवर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी संचालक व आमदार जयकुमार गोरे यांनी सातत्याने केला आहे. तसेच खा.उदयनराजे भोसले यांनी देखील बँकेच्या कारभारावर सातत्याने ताशेरे ओढले आहेत.
मात्र, काल पर्यंत परस्पर महाबळेश्वर, इस्त्रायल तसेच अनेक दौरे संचलकानी करून अगोदरच कोट्यवधी रुपये शेतकऱ्याचे पाण्यात घातलेले असताना आता चक्क युरोप दौऱ्यावर संचलक गेले आहेत. या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचा खर्च बँकेचा आणि परिणामी शेतकऱ्यांनी दिलेल्या व्याजाच्या पैशाचा होणार आहे. वास्तविक सहकार क्षेत्र आणि युरोप राष्ट्रांचा काडीमात्र संबंध नसताना तसेच मजूर आणि पाणीपुरवठा क्षेत्राचा देखील काडीमात्र संबंध नसताना शेतकऱ्यांची आणि मजुरांची पोर म्हणून संचालक झालेले नेमके युरोप दौऱ्यावर नेमके कोणत्या अभ्यासासाठी गेले आहेत ? याची देखील चौकशी आता केंद्रीय तपास यंत्रणांनी केली पाहिजेच तसेच युरोप दौऱ्यावरून आल्यानंतर नेमका कोणता अभ्यास संचलाकानी केला ? ही परीक्षा शेतकरी आणि रयत क्रांती संघटना घेणार आहे. अशी माहिती प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिली आहे.
You must be logged in to post a comment.