सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): जालना जिल्ह्यातील अंतरवली सराट येथील मराठा आंदोलकावरील झालेल्या लाठीहल्लाच्या निषेधार्थ राज्यभर पडसाद उमटत आहेत. रविवारी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. या बैठकीत सोमवार दि. ४ सप्टेंबर रोजी सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
दरम्यान,शांततेच्या मार्गाने हा बंद करण्यात येणार असून व्यापाऱ्यासह सर्व दुकानदारांनी बंदला पाठींबा दिला आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे.
जालन्यात मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू होते. मात्र त्याला शुक्रवारी गालबोट लागले. पोलिसाकडून आंदोलकावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत.अनेक राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांनी अंतरवली येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आंदोलकावर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात सर्वत्र मोर्चे, रास्तारोको, मूकमोर्चे निघाले.शनिवारी राजधानी सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला.
रविवारी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची साताऱ्यात बैठक झाली. या बैठकीत अंतरवली सराट ता. अबंड जिल्हा जालना येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच राज्य सरकार व प्रशासनाचा तीव्र जाहीर निषेध करण्याकरता सोमवारी सातारा जिल्हा बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आली.मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत बंदची हाक देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सातारा जिल्ह्यात सोमवारी बंदची हाक देण्यात आली. या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.
सर्व मराठा बांधवानी सोमवारी सकाळी ९ वाजता शिवतीर्थ पोवई नाका येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले असून पोवईनाका शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात येणार यावेळी अंतरवली सराट येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
You must be logged in to post a comment.