डॉक्टर्स नव्हे; ही तर देवमाणसं !


जीवन- मृत्यूच्या खेळात मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या रुग्णावर उपचार करून त्याला नवजीवन प्रदान करणारे हात जर कुणाला लाभले असतील तर ते डॉक्टरांच्या रुपात जन्म घेतलेल्या देवमाणसांना..! आज या देवमाणसांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस अर्थात 1 जुलै डॉक्टर्स डे ! 

अवघ्या जगावर कोरोनासंकट काय कोसळले या डॉक्टररूपी देवमाणसांचे हात अभयकर बनून माणसाच्या मदतीला धावले. लॉकडाऊनमुळे प्रार्थनास्थळांचे दरवाजे बंद झाल्यानंतर देवासमोर जोडले जाणारे हात या माणसातल्या देवमाणसांसमोर जोडले गेले.

आजअखेर साडेतीन लाख रुग्णांचे वाचवले प्राण 
कोरोनाचा विषाणू संसर्गजन्य असल्याने बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणार्‍या हरएक व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता असतानाही हे डॉक्टर्स मात्र आपला जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांवर उपचार करत आहेत. अहोरात्र आपली सेवा बजावत आहेत. समोर आलेला रुग्ण मग तो कोरोनाबाधित असो वा अन्य आजाराने ग्रस्त; हे डॉक्टर्स आपली सेवा प्रदान करण्यात जरा देखील मागे हटत नाहीत. या त्याच्या सेवेचे फळ म्हणून की काय कोरोनाची लागण झालेल्या भारतातील 3 लाख 47 हजार रुग्णांना याच हातांमुळे नवजीवन लाभले. मास्क, सॅनिटायझर आणि नखशिखांत पीपीई किट परिधान करून रुग्णाला जीवनदान देण्याचा विडा उचललेले हे हात आज आपल्या सर्वांसाठी वरदहस्त ठरत आहेत.

आज प्रत्येक डॉक्टर बिधानचंद्र रॉय !
रुग्णांच्या सेवेसाठी उभे आयुष्य वेचणारे महान डॉक्टर भारतरत्न बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ 1 जुलै हा दिवस ’डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो पण आज जगात पसरलेले हे कोरोनासंकट पाहाता रुग्णांची सेवासुश्रुषा करणारा प्रत्येक डॉक्टर बिधानचंद्र रॉय बनलेत.

वैद्यकीय सुविधा पुरवण्यात दिरंगाई नको
कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करताना इतर रुग्ण आणि स्वतःला लागण होऊ नये म्हणून डॉक्टरांना काळजी घ्यावी लागत असतानाच आपल्या कुटुंबाशी संपर्कात येतानाही विशेष काळजी घेण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. डॉक्टरांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे जसं गरजेचं आहे तसेच शासनानेही त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करतेवेळी त्यांना वेळोवेळी लागणारे वैद्यकीय साहित्य जसे की मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट आणि प्रतिकारशक्तीवर्धक औषधे पुरविण्याकडे शासनाने अधिकाधिक लक्ष घालणे गरजेचे आहे. खेडोपाड्यांत रुग्णांची सेवा करणार्‍या या कोरोनायोध्यांना या वैद्यकीय सेवा अजूनही पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत असं चित्र पाहायला मिळत आहे. बहुतांश ग्रामीण भागात या सुविधांची वानवा आहे. ज्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तसेच तेथील स्थानिक नेते मंडळींनी याकडे स्वतः लक्ष घालणे आवश्यक आहे. गावागावांतील विविध कोरोना केअर सेंटर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतील डॉक्टरांना या या पुरेशा वैद्यकीय सुविधांअभावी रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे शिवाय उपचार करतेवेळी त्यांचा सातत्याने रुग्णांशी संपर्क येत असल्याने त्यांना वारंवार स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी लागत आहे. अशावेळी सर्वांत जास्त गरज भासते ती मास्क आणि सॅनिटायझरची. त्यामुळे या आवश्यक गोष्टींचा साठा मुबलक प्रमाणात होतोय की नाही हे ही पाहाणे तितकेच गरजेचे आहे.

डॉक्टररूपी देवमाणसांना ’भूमिशिल्प’चा सलाम !
रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनायुद्धाच्या मैदानात उतरलेल्या या डॉक्टरांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. आजचा प्रत्येक डॉक्टर हा कोरोना योद्धा बनून लढतोय. जीव अन जीव वाचवण्यासाठी धडपडतोय.
कोरोनासंकट काळात माणसाला निस्वार्थीपणे सेवा देणार्‍या या डॉक्टरांना ’भूमिशिल्प’ चा सलाम !
या डॉक्टरांसह परिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचेही सेवाभावी हात तितक्याच सामर्थ्यानं राबत आहेत हे ही आपणास विसरून चालणार नाही.‘डॉक्टर्स डे’ निमित्त या माणसांतल्या देवमाणसांना आरोग्यदायी शुभेच्छा.
error: Content is protected !!