सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनाने डॉल्बीला परवानगी का नाही, याचे पत्र काढावं. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक घटकाचा विचार करून निर्णय घेतले पाहिजे. डॉल्बी वाजलीच पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. दोन-तीन तासाने असं काय आभाळ कोसळणार आहे, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
उदयनराजे म्हणाले, ” साताऱ्यात डॉल्बी सिस्टीम वाजलीच पाहिजे. पोलिसांनी प्रशासनाला डॉल्बी का नको आहे. याचे त्यांनी आम्हाला पहिल्यांदा उत्तर द्यावे. सातारा जिल्ह्यात डॉल्बी वाजवली जावी, याकरिता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तेव्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी डॉल्बीला सशर्त परवानगी दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले. मात्र, नंतर पोलिसांनी यू टर्न घेत डॉल्बीला परवानगी नाहीच, अशी भूमिका मांडली.
उदयनराजे म्हणाले, व्यवसायिकांच्या कुटुंबीयांचा प्रशासनाने एकदा तरी विचार केला पाहिजे. त्यांनी मोठ्याप्रमाणात गुंतवणूक केली आहे. डॉल्बीवर बंदी घातल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे. सातारा शहरात डॉल्बीला बंदी आणि इतर ठिकाणी डॉल्बी मात्र जोरजोरात वाजते, असा दुटप्पीपणा व्हायला नको.
You must be logged in to post a comment.