गटांगळ्या खाणाऱ्यांची सोबत आता नकोच; आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा घणाघात

गोडोलीतील कोपरा सभेत उदयनराजे यांना मताधिक्य देण्याचे आवाहन

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): महाविकास आघाडी ही प्रवाहाविरोधातील आघाडी आहे.त्यासोबत जाणारे नेते आणि कार्यकर्ते गटांगळ्या खात आहेत.अशा गटांगळ्या खाणाऱ्यांची आपल्याला सोबत नकोच, असा घणाघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. तसेच सातारा शहरातून उदयनराजेंना मोठे मताधिक्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सातारा शहरातील गोडोली येथे भैरवनाथ पटांगणात आयोजित केलेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. याप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले, माजी नगरसेवक ॲड.डी.जी. बनकर, शेखर मोरे पाटील, सुनील मोरे, विजय नाफड, ॲड.बाळासाहेब बाबर, शिरीष चिटणीस, सुनिता फरांदे, अविनाश कदम, अमोल मोहिते, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक व्यंकटराव मोरे, माजी पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, भाजप महिला व मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या सुवर्णाताई पाटील,अजिंक्यतारा सूतगिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, संभाजीनगरचे सरपंच सतीश माने, राजू पिसाळ, सागर भोसले, सचिन तिरोडकर, फिरोज पठाण, माजी नगराध्यक्ष अशोक मोरे यांची उपस्थिती होती.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, खासदार उदयनराजेंच्या विरोधात उभे असलेल्या उमेदवाराकडे जिल्ह्याचे अनेक वर्ष पालकमंत्री पद होते. त्यांनी त्या काळात एकही ठोस काम केले नाही. साताऱ्यासाठी त्यांनी काय दिलं? हे त्यांना आता विचारायला हवं. याउलट महायुती सरकारने साधारण शहरासह हद्दवाढीतील जनतेसाठी कोट्यवधीची कामे मंजूर केली,असे ही ते म्हणाले.ज्यांनी आपल्याला दिलं त्यांना परत करण्याची वेळ निवडणुकीच्या निमित्ताने आलेली आहे. सर्वांनी बूथची नीटनेटकी रचना करावी. जास्तीत जास्त मतदार बाहेर काढून मतदान करून घ्यावे. विरोधी महाविकास आघाडीकडे शहरात कार्यकर्तेच नाहीत. याचा फायदा घेऊन उदयनराजेंना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचे प्रयत्न सर्वांनी करावे.

शेखर मोरे पाटील म्हणाले, शहराच्या हद्दवाढीचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम दोन राजांनी केले आहे.सुमारे ३२ कोटींची पाणी योजना मंजूर केली. छत्रपती संभाजी क्रीडा संकुलासाठी मंजुरी मिळालेली आहे.

व्यंकटराव मोरे म्हणाले, भाजप सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. आपले स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी संसदेत प्रतिनिधित्व करणे गरजेचे आहे.

अविनाश कदम म्हणाले, साताऱ्यात ५९९ कोटी रुपयांची कामे आणली आहेत.हे काम खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी करून दाखवले आहे. नेता सक्षम असेल तर किती वेगाने विकास होतो, याचे हे उदाहरण आहे. देगाव येथील एमआयडीसीला विरोध करून तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचे कृष्णकृत्य विरोधकांनी केले, त्यांना आता जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!