लोटांगण घालणाऱ्या सोंगाड्यांना भूलू नका

उदयनराजे यांचे कार्वेतील सभेत जाहीर आवाहन

कराड,(भूमिशिल्प वृत्तसेवा): स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडे साठ वर्षे सलग सत्ता होती. मात्र या काळात जेवढा विकास काँग्रेसला करता आला नाही, तेवढा मोदी सरकारच्या काळात दहा वर्षांत झाला आहे. आता देशाला पुन्हा अधोगतीच्या मार्गावर नेण्यासाठी काँग्रेस व त्यांचे मित्र पक्षाचे नेते अंगात सोंग आणून तुमच्यापुढे लोटांगण घालतील, अशा सोंगाड्यांच्या थापांना भुलू नका, असे जाहीर आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

कार्वे (ता. कराड) येथे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे जिल्हा प्रभारी डॉ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक निवासराव थोरात, बाजीराव निकम, वसंतराव शिंदे, दत्तात्रय देसाई, विजय जगताप, दयानंद पाटील, पैलवान धनाजी पाटील, भाजप युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष संग्राम बर्गे, संपतराव थोरात, बाळासाहेब पाटील, सर्जेराव कुंभार, प्रवीण थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उदयनराजे म्हणाले, काँग्रेसने विश्वास गमावल्याने भाजपच्या हाती लोकांनी सत्ता दिली. अवघ्या दहा वर्षांत भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांच्या महायुतीने देशात कायापालट करण्यासारखे काम केलेले आहे. ज्या लोकांनी काँग्रेसवर विश्वास ठेवला, त्यांना गृहीत धरण्याचे काम काँग्रेस नेत्यांनी केले. लोकांच्या कष्टाच्या पैशाचा अनेकांनी अपहार केला. सर्वसामान्य लोकांना विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजेत, त्या केलेल्या नाहीत. लोकांची आता कुठे उन्नती होत आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार सत्तेवर असेल तर निश्चितपणे विकास सातत्याने असाच होत राहील. माझ्या विरोधात महाविकास आघाडीचा जो उमेदवार उभा केलेला आहे, त्याने तब्बल ४००० कोटींचा भ्रष्टाचार केलेला आहे. अशा भ्रष्टाचारी लोकांना निवडून देऊन विकास कसा होणार हे जनतेने लक्षात घ्यावे.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. स्टार्ट अप सारखी कल्पना या सरकारने विकसित केली. कोरोना च्या काळामध्ये जगातील केवळ तीन ते चार देश व्हॅक्सीन तयार करू शकले, त्यामध्ये भारताचा नंबर लागतो. भारत सरकारने देशाच्या १४० कोटी जनतेला कोविड प्रतिबंधक मोफत व्हक्सिनेशन केले आहे, ही केवढी मोठी बाब आहे. प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याचे धोरण मोदी सरकारने राबवलेले आहे, त्याची गॅरंटी देण्याचं धाडस देखील मोदी सरकारनेच केलेला आहे. वयाचे ७० वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी शासन घेणार अशी तरतूद देखील मोदी सरकार करायला निघालेले आहे. त्यासाठी या सरकारचे हात बळकट करणे गरजेचे आहे. लोकसभेची यंदाची निवडणूक गांभीर्याने घेण्याची गरज आहे. उदयनराजे भोसले यांना पुन्हा लोकसभेत पाठवायचे आहे. सर्वांनी मनात आणलं तर कराड दक्षिण मधून ७० टक्के पेक्षा जास्त मते उदयनराजेंना मिळतील.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रचार दौरा सुरू असून त्याला कराड तालुक्यातून फार मोठा प्रतिसाद मिळतो आहे. कराड दक्षिण मधील गावांमध्ये अवघ्या दोन वर्षात ४३३ कोटी रुपयांचा निधी आणण्यात यश आलेले आहे. उदयनराजेंचे हात पाठीशी असल्यामुळे हे शक्य झाले. सर्वांनी बूथनिहाय काम करावे भूतची तो चिनाव जितो हे धोरण राबवले तर उदयनराजेंना कराड तालुक्यातून मोठे लीड मिळेल. निवासराव थोरात यांनी प्रास्ताविकात कार्यातील रस्त्याच्या कामासाठी १९ कोटी ४० लाखांचा निधी उदयनराजे यांनी दिला असल्याचे सांगितले.

इंदिरा गांधींनीच संविधानाची मोडतोड केली

संविधानाची मोडतोड आणीबाणीतच झाली होती. मोदी संविधान बदलायला निघाल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. वास्तविक, आणीबाणीच्या काळातच संविधानाची मोडतोड काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांनी केली होती. पंडित नेहरूंनी तर संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्याचं कृत्य दोन वेळा केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या मानसिक त्रासातूनच मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आता खोटं नाटक उभे करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेसने नेते करत आहेत, अशी टीकाही उदयनराजेंनी केली.

कॉलर उडवतो कुणाला लुबाडत नाही…

माझी कॉलर उडवण्याची स्टाईल सर्वत्र फेमस झाली. मात्र मी कॉलर उडवत असलो तरी कोणाला लुबाडत नाही. लोकांचं कल्याण करण्याचा व्रत मी हाती घेतलेले आहे. मी कालही तुमचा होतो, आजही तुमचा आहे..आणि उद्याही तुमचाच राहणार यात शंका ठेवू नका. भ्रष्टाचारी लोकांबाबत मला प्रचंड चीड आहे. अन्याय, अत्याचार मला सहन होत नाही. चुकीला चूक म्हणण्याची हिंमत माझ्याकडे आहे, असं देखील उदयनराजे म्हणाले.

उदयनराजेंची मार्मिक टिप्पणी आणि हास्यकल्लोळ

उदयनराजे यांचे भाषण सुरू असताना माइक मधून खरखर येत होती, त्यामुळे दोन वेळा ऑपरेटरने माईक तपासण्याचा प्रयत्न केला, त्यावर उदयनराजेंनी मिश्किल टिप्पणी करत मी बोलू का नको.. का विरोधकांनी तुम्हाला मला थांबवण्याची सुपारी दिली आहे, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उसळला.

सभेतील ठळक मुद्दे

  • अतुल भोसले कराड दक्षिणचे भावी आमदार असतील अशी उदयनराजेंची घोषणा.
  • डॉ. अतुल भोसले यांचे भाषण सुरू असताना अजान सुरू होताच त्यांनी काही काळ भाषण थांबवले.
  • उदयनराजेंचे हात पाठीवर असल्यामुळेच कराड दक्षिणचा विकास झाल्याचे डॉ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केले.
error: Content is protected !!