साताऱ्यातून १०० टक्के मतदान करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): मी आणि शिवेंद्रराजे दोघेही गेले ३५- ४० वर्षांपासून तुमच्या सेवेत आहोत. आमचा वैयक्तीक कोणताही स्वार्थ नाही. आम्हाला फक्त तुमची सेवा करायची आहे. शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून सातारा शहर आणि सातारा- जावली मतदारसंघात असंख्य विकासकामे झाली आहेत. तुमची सेवा करण्याची संधी त्यांना पुन्हा द्याल यात मला तिळमात्र शंका नाही. गत निवडणुकीत शिवेंद्रराजेंना २ नंबरचे मताधिक्य मिळाले होते.यावेळी आपल्या सातारकरांसाठी मोठी संधी चालून आली आहे. शिवेंद्रराजेंना एक नंबरचे मताधिक्य देण्याची ही संधी दवडू नका. शिवेंद्रराजेंना १ नंबरचे मताधिक्य देऊन एक आगळावेगळा इतिहास घडवा, असे आवाहन खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
शाहू चौक, सातारा येथील जुने दिग्विजय शोरूम येथे शिवेंद्रराजेंच्या सातारा शहर प्रचार कार्यालयाचा शुभारंभ खा. उदयनराजेंच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी नारायणदास दोशी, डॉ. संदीप श्रोत्री, सुनील काटकर, भाजपचे जेष्ठ नेते दत्ताजी थोरात, अंजली कुलकर्णी, ॲड. दत्ता बनकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र लवंगारे, विकास गोसावी, प्रकाश गवळी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
खा. उदयनराजे म्हणाले, माझं- तुझं असं काही नाही. कोणताही दुजाभाव आम्ही मानत नाही. पदाच्या माध्यमातून आम्हाला तुमची जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून शिवेंद्रराजे उभे आहेत. छत्रपतींचा वारसा जोमाने पुढे नेण्याचे काम आम्ही दोघेही करत आहोत. तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या. पद नसले, सत्ता नसली तर, जनतेचे प्रश्न, समस्या सोडवण्यात आणि जनतेला अपेक्षित विकासकामे मार्गी लावण्यात अडचणी येतात. समोर कोण आहे याचा विचार न करता जास्तीत जास्त मतदान शिवेंद्रराजेंना करा आणि आपली ताकद दाखवून द्या.
शिवेंद्रराजे म्हणाले, महायुती सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. असंख्य विकासकामे झाली आहेत. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपला वॉर्ड, प्रभाग आणि आपले गाव सांभाळावे. आपण केलेली सर्व कामे, योजना लोकांपर्यंत पोहचवा आणि जास्तीत जास्त मतदान कसे होईल याकडे लक्ष द्या. आम्ही लोकांच्या सेवेत कधीच कुठे कमी पडणार नाही. यावेळी विक्रमी मताधिक्य देऊन मला विजयी करा. माझ्या विजयाचे शिल्पकार बनून सातारकर आणि सातारा- जावलीतील जनतेने एक वेगळा इतिहास निर्माण करावा असे आवाहन शिवेंद्रराजेंनी केले.
यावेळी उपस्थित भाजप आणि महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सातारा विकास आणि नगर विकास आघाडी तसेच भाजपचे सर्व आजी- माजी पदाधिकारी, सर्व आजी- माजी नगरसेवक यांनी शिवेंद्रराजेंना १०० टक्के मतदान करून विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
You must be logged in to post a comment.