छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका :आ.शिवेंद्रसिंहराजे

खोटा कळवळा नको,जावळीसाठी किती रूपये आणले ते जाहीर करा

मेढा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराजांनी या जावळीतूनच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. आम्ही देखील संघर्ष करूनच जावळीत ताकद वाढवली आहे. पराक्रमी छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना दिला.

लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी जावळीतील मानकुमरे पॉईंट येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, जि.प.माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक  ज्ञानेश्वर रांजणे,  सुनील काटकर,  सौरभ शिंदे,  जयदीप शिंदे,  सयाजीराव शिंदे,  शिवाजीराव मर्ढेकर, लक्ष्मणराव कडव, एकनाथ ओंबळे, पांडुरंग जवळ, गीताताई लोखंडे, कविता धनावडे, निर्मलाताई दुधाणे, कांतीबाई देशमुख, दत्ता पवार, रवी परामणे, अंकुश शिवणकर, तानाजीराव शिर्के, विनोद वेदे, अविनाश कारंजकर, अशोक भोसले, वीरेंद्र शिंदे, संदीप परमणे, समाधान पोकळे, भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, दादा पाटील, बाळासाहेब पाटील-सरपंच आनेवाडी, नाना पवार, विठ्ठल मोरे-संचालक प्रतापगड कारखाना, रामभाऊ शेलार, तुकाराम धनवडे, सागर धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, जावळीत ज्यांच्याशी संघर्ष करून आम्ही उभे राहिलो, तेच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या विरोधात उभे आहेत. भाजपच्या माध्यमातून आम्ही कोट्यावधीची कामे जावळीत केली. आता जर काम न करणाऱ्यांना साथ दिली गेली तर हेच लोक आपल्या सर्वांच्या डोक्यावर मिरे वाटतील. विधानसभा, ग्रामपंचायत, सोसायटी निवडणुकांमध्ये पुन्हा संघर्ष करावा लागेल. विरोधकांना जावळीचा इतकाच कळवळा होता तर विधान परिषद फंडातून त्यांनी किती रुपये जावळीसाठी आणले त्याची आकडेवारी जाहीर करावे असे आव्हान त्यांनी दिले. 

ते पुढे म्हणाले ,बोंडारवाडी धरणाचे काम रखडले आहे. नुकतेच एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जावळीत येऊन गेले. ते सत्तेवर असतानाच या विषयाचा तुकडा त्यांनी का पाडला नाही, त्यामुळे केवळ देखावा करून मते मागणाऱ्यांपासून सावध रहा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

भावनेच्या भरात विरोधकांना भूलू नका

विरोधक स्वाभिमानाची भाषा करत लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. या भावनिक प्रचाराला भूलू नका. भावनेच्या भरात विकास कामे होत नाहीत. त्यासाठी व्यापक लोकहिताचा दृष्टिकोन आवश्यक असतो, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

error: Content is protected !!