सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाई तालुक्यातील धोम येथील संतोष पोळने ६ महिलांचा खून करून त्यांचा मृतदेह स्वतःच्या घऱाच्या अंगणात व फार्म हाऊसमध्ये खड्डे काढून जमिनीत गाडले होते. त्यानंतर आज अशा प्रकारच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती समोर आली आहे. साताऱ्यातून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आसले, ता. वाई येथे सापडला. याप्रकरणाचा उलघडा करीत असताना संशयित आरोपींना अशाच प्रकारे आपल्या पत्नीचाही खून केल्याची कबुली दिली. पत्नीचा मृतहेह गावच्या डोंगर परिसरात पुनरून टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि आशिष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिनांक ३१ जुलै रोजी रात्री दहा वाजता सातारा येथून बेपत्ता झालेल्या सौ. संध्या विजय शिंदे, वय ३४ रा. कारी, ता.जि. सातारा या बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. दरम्यान मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत आसले ता. वाई येथील ऊसाच्या शेतात एक मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यासोबत सापडलेले आधारकार्ड व इतर कागदपत्रे यांची पडताळणी केली. त्यानंतर सदर मृतदेह हा संध्या शिंदे हिचा असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीसांनी शवविच्छेदनासाठी सातारा येथे पाठविला. मृतदेहाचे बांधलेले हात आणि तोंडावरील जखमांवरून हा खुनच असावा असा प्राथमिक अंदाज बांधून सपोनि कांबळे यांनी घटनास्थळापासून तपासाला सुरुवात केली.
मोबाइल लोकेशनच्या आधारावर संशयितापर्यत पोहचण्यासाठी विशेष पथक रवाना केले. बुधवारी सकाळी कारी, ता. जि. सातारा येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईकांनी भुईंज पोलीस ठाण्यात येवून संध्या शिंदे यांचा खून नितीन आनंदराव गोळे, रा. व्याहळी, ता. वाई यांनीच केला असल्याची फिर्याद दिली व तातडीने संशयित आरोपीला अटक करा अशी मागणी केली. यावरून भुईंज पोलीसांनी संशयित आरोपी नितीन गोळे याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालू केले होते. परंतु अद्याप तो सापडला नव्हता. त्यासाठी स.पो.नि. आशीष कांबळे, डी. बी. पथकातील रविराज वर्णेकर, प्रसाद दुधस्कर, तुकाराम पवार, अतुल आवळे, शिवाजी तोरडमल, आनंदराव भोसले, बापूराव धायगुडे, प्रियांका कदम, दिपाली गिरी-गोसावी, सातारा एल.सी.बी.चे स.पो.नि. रमेश गर्जे, सहाय्यक फौजदार उत्तमराव दबडे, सुधीर बनकर, संतोष सपकाळ, संतोष पवार, रवी वाघमारे,सचिन ससाणे या सर्वांनी पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे- खराडे या टीमने फरार आरोपी असलेला नितीन गोळेच्या शोधासाठी वैराटगड पायथ्याशी असलेला डोंगरद-या परिसर रात्रंदिवस फिरून शोधण्याचा प्रयत्न केला असता अपयश आले होते. आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन थेट कर्नाटकातील बेळगाव परिसरात पसार झाल्याची माहिती सपोनि आशिष कांबळे यांना दिनांक ९ ऑगस्ट रोजी मिळाली होती. त्यांनी स्वतः सहकाऱ्यांसोबत बेळगाव येथे सापळा रचून काल दिनांक १० रोजी ५ वाजणेच्या सुमारास अटक केली. त्याला भुईंज पोलीस स्टेशनमध्ये आणून अटक करून त्याच्यावर दोन महिलांचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता मयत संध्या शिंदे व त्याची स्वतःची पत्नी मनीषा नितीन गोळे, वय ३५ वर्षे, रा. व्याजवाडी हिचादेखील दिनांक ०१/०५/२०१९ रोजी खून करून तिचाहि मृतदेह त्याने पुरून टाकल्याची कबुली भुईंज पोलिसांना दिली आहे. आरोपीस दिनांक १२ रोजी वाईच्या न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे
You must be logged in to post a comment.