सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त सातारा जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दाभोलकरांच्या खूनाच्या सूत्रधारांचा तपास त्वरित लावण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात म्हटले आहे की, २० ऑगस्ट २०२१ ला डॉ नरेंद्र दाभोलकर ह्यांच्या निर्घृण खूनाला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या खूनाच्या सूत्रधारांच काय झाले ? त्यांना कधी पकडणार ? डॉ. नंरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाच्या सूत्रधारांचा त्वरित तपास लावून कायदेशीर कारवाई करण्याची महाराष्ट्र अंनिस तर्फे शासनाला या निवेदनाद्वारे आम्ही सातारा जिल्हा अंनिस तर्फे मागणी करत आहोत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ मध्ये डॉक्टर विरेन्द्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. अमोल काळे या संशयित आरोपीविरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींच्या विरुद्ध देखील अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. या खूनाचा तपास डॉक्टर वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. या खूनामागील सूत्रधार कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास होऊन डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खूनामागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही.
यावेळी महा.अंनिस चे राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ.हमीद दाभोलकर , प्रशांत एस. पोतदार, जिल्हा कार्याध्यक्ष -वंदना माने, जिल्हा प्रधान सचिव- हौसेराव धुमाळ, भगवान रणदिवे, राजेंद्र पवार, विलास भांदिर्गे, अभय भांदिर्गे, शंकर कणसे , सीताराम चाळके, दशरथ रणदिवे, जयप्रकाश जाधव, डॉ.दीपक माने, दिलीप महादार, रामचंद्र रसाळ, योगिनी मगर, रुपाली भोसले, दिलीप कणसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.