नागरिकांनी सतर्क राहावे : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यात सध्या मुसळधार पाउस सुरु असून हवामान विभागाने अजून काही तास अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी यांनी सुरक्षिततेच्या कारणांस्तव जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या शुक्रवार दिनांक २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली असून त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत. तसेच पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन श्री.डूडी यांनी केलं आहे.
सातारला पावसाने चांगलेच झोडपले आहे. गेले चार दिवस शहर व परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. कोयना धरण परिसरात देखील जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
हवामान विभागाने येत्या काही तासात सातारा शहर आणि जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना म्हणजेच सर्व शाळा, महाविद्यालयांना शुक्रवार दिनांक २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत.
दरम्यान,शाळा व महाविद्यालयातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत संबधीत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे. असे स्पष्ट केलं आहे तसेच इयत्ता १० वी व १२ वी च्या जुलै २०२४ च्या फेरपरीक्षा राज्य मंडळ पुणे यांचे वेळापत्रकानुसार सुरू ठेवण्याचे आदेशात नमूद केले आहे.
आज कोयना धरणातून ११ हजार तर कण्हेर धरणांतून ५ हजार क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक नद्यांमध्ये पाणी वाढत आहे व पाण्याची आवक वाढल्याने धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तसेच विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डूडी यांनी केले आहे.
You must be logged in to post a comment.