शेतकर्‍यांच्या योगदानामुळे अजिंक्यतारा कारखाना राज्यात आदर्श : आ. शिवेंद्रसिंहराजे

अजिंक्यतारा कारखान्याची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): गाळपासाठी येणार्‍या ऊसाला एफआरपीनुसार सातत्याने दर देवून अजिंक्यतारा कारखान्याने एक आदर्श निर्माण करतानाच शेतकर्‍यांचा विश्‍वास द्विगुणीत केला आहे. सातारा तालुक्यातील शेतकर्‍याला आर्थिक सक्षम करण्याचे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार करणार्‍या या संस्थेच्या प्रगतीत कामगार कर्मचार्‍यांसह सभासद शेतकर्‍यांचे मोलाचे योगदान आहे. कारखाना व्यवस्थापनाचे उत्कृष्ट व काटेकोर नियोजन आणि काटकसरीचे धोरण यामुळे  कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यास मदत झाली आहे. सर्वांच्या योगदानामुळेच अजिंक्यतारा कारखाना राज्यामध्ये एक आदर्श कारखाना म्हणून गणला गेला आहे, असे गौरवोद्गार कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.  

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभुमीवर राज्य शासनाने सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलून दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. मात्र, सद्यपरिस्थितीमध्ये राज्यात व जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा पुनश्‍च प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य शासनाचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे दि. ८ मार्च २०२१ च्या आदेशानुसार ५० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी असल्याने सभा ऑनलाईन घेण्यास परवानगी दिली आहे. यास्तव अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची सन  २०१९-२०२० या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही ऑनलाईन पध्दतीने कारखाना र्कास्थळावर काल रविवारी झाली. या ऑनलाईन सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी ज्या सभासदांनी कारखान्याकडे नोंदणी केली होती अशा सभासदांना सभेची लिंक पाठविण्यात आलेली होती. या सभेत आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. चेअरमन सर्जेराव सावंत अध्यक्षस्थानी होते.
कोरोना पार्श्‍वभूमीवर शासनाने सभा घेण्यास घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन म्हणून संचालक मंडळ, सभासद, संबंधीत अधिकारी मिळून फक्त 50 व्यक्ती उपस्थित होत्या.सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले. कारखाना प्रगतीपथावर नेण्यास मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचा सिंहाचा वाटा असल्यामुळे संचालक मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच न्यू दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन या शिखर संस्थेकडून कारखान्यास सन २०१९-२०२० या वर्षाचा ऊसउत्पादकतेचा राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क‘मांकाचा पुरस्कार मिळाल्यामुळे शेंद्रे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले, सर्व संचालक आणि कार्यकारी  संचालक संजीव देसाई यांचे अभिनंदन केले. तसेच प्रा. जयंवत नलावडे-वाढे यांनी सर्वांचे अभिनंदन करून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तसा अभिनंदनाचा ठराव पारित करण्याबाबत आग्रहाची सुुचना सभेच्या प्रारंभी कारखान्याचे संस्थापक आदरणीय स्व.आमदार श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोंसले तथा भाऊसाहेब यहाराज यांचे प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष विश्‍वास शेडगे यांनी ऑनलाईन सभेस उपस्थित झालेल्या सभासदांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. अहवाल सालात व तद्नंतरचे कालावधीमध्ये शहीद झालेले जवान, कोरोना महामारीमुळे दिवंगत झालेले नागरिक व दिवंगत झालेल्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यकारी संचालक देसाई यांनी सभेची नोटीस व अहवाल वाचन केले. सर्व विषयास ऑनलाईन उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. तसेच सभासदांनी लेखी पत्राद्वारे विचारलेल्या प्रश्‍नांना आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी ऑनलाईन पध्दतीने समर्पक उत्तरे देऊन सभासदांचे समाधान केले.
ऊस उत्पादक सभासदांना कारखान्याचा केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताला नेहमीच संचालक मंडळ प्राधान्य देत आहे. मागील सन २०१९-२०२० या हंगामात कारखान्याचा साखर उतारा हा अत्युत्तम राहिल्यामुळे चालू सन २०२०-२०२१ चे गाळप हंगामाकरिता आपले कारखान्याची प्रति मे.टन रूपये ३०४३/- इतकी निघालेली आहे. ऊसउत्पादक शेतकर्‍यांचे दर दहा दिवसांचे ऊस पेमेंट करणारा आपला कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना आहे. सभासदांचे हित व काळाची गरज लक्षात घेऊन उपपदार्थांचे उत्पन्न वाढविण्याकरिता संचालक मंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यामध्ये सुध्दा एफ.आर.पी. आदा करण्यासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये यासाठी कारखान्याचे आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून लवकरच डिस्टीलरी व इथेनॉल प्लॅन्टचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.   केंद्र शासनाचे आयईएम विभागाकडून कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन २५०० मे.टनावरून ४५०० मे.टन पर्यंत करून घेण्यास परवानगी मिळालेली आहे. दिवसेंदिवस साखर उत्पादनासाठी वाढत असलेला खर्च विचारात घेता साखरेची किमान किंमत प्रति क्विंटल रूपये ३४००/- ते ३५००/- वाढवून दिल्यास एफ.आर.पी. प्रमाणे पेमेंट आदा करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. किमान किंमत वाढवून दिल्यास साखर उद्योगास फार मोठा दिलासा मिळेल. यासाठी राज्य स्तरावरून व देश पातळीवरून तसे प्रयत्न होणे आवश्यक आहे.
कारखान्याकडे गत २०१९-२०२० या हंगामाचे उत्पादनामधील शिल्लक असलेला साखर साठा व चालू गळीत हंगामाचे साखर उत्पादन विचारात घेता कारखान्याकडे जास्तीचा साखर साठा पडुन राहू नये ही बाब विचारात घेता चालू सन गाळप हंगामामध्ये रॉ शुगर साखरेेचे उत्पादन घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला असून आत्तापर्यंत या हंगामात ६,१७,१५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्यामध्ये ३,०१,८१० क्विंटल रॉ शुगर उत्पादन घेऊन रॉ शुगर थर्ड पार्टीमार्फत निर्यात करण्यात येत आहे. चालू गाळप हंगामामध्ये आत्तापर्यंत ५,२८,८३० मे.टन ऊसाचे गाळप झाले असून या ऊसाची प्रति मे.टन रूपये २६००/- प्रमाणे पहिल्या ऍडव्हान्स हप्त्याची होणारी रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खाती वर्ग केली आहे. या हंगामाकरिता कार्यक्षेत्रामध्ये गाळपासाठी उपलब्ध असलेले क्षेत्र विचारात घेता ७.०० लक्ष मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे. यासाठी आवश्यक तेवढी ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणा करारबध्द केली असून ती विभागवार कार्यरत आहे. सदरचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संचालक मंडळाने तसे नियोजन केले आहे. भाऊसाहेब महाराजांच्या पाठीशी आपण जसे हिंमतीने उभे राहिलात तसेच माझ्याही पाठीशी आपण सर्वांनी उभे राहून ही मातृसंस्था अधिकाधिक प्रगतीपथावर कशी जाईल यासाठी नेहमीच मोलाचे सहकार्य करीत आहात याचा मला अभिमान वाटतो, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.  
कारखान्याचे संचालक नामदेव सावंत यांनी ऑनलाईन उपस्थितांचे आभार मानले. सभेला सर्व संचालक आणि सभासद ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.

error: Content is protected !!