शाही दसऱ्याचा निधी पूरग्रस्तांकडे वळवा!

आपत्तीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंचे ‘आदर्श सीमोल्लंघन’

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यातील तसेच देशातील अनेक भागांवर ओढावलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऐतिहासिक शाही विजयादशमी व सिमोल्लंघन सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडणार आहे. शासनाने या सोहळ्यासाठी राखून ठेवलेला निधी पूरग्रस्तांच्या मदत कार्यासाठी वळवावा, तसेच प्रत्येक नागरिकानेही आपल्या परीने पूरबाधितांसाठी मदत करावी, असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण, सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग आणि देशातील अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी, पशुधनाचे नुकसान झाले असून बळीराजा अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. जनजीवन विस्कळीत झालेल्या या परिस्थितीत शाही दसरा थाटामाटात, डामडौलात साजरा करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे गुरूवार दि. २ ऑक्टोबर रोजीचा विजयादशमी सिमोल्लंघन सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मानवतेच्या हाकेला प्रतिसाद देत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रत्येकाने पुढे यावे, असे आवाहन खासदार उदयनराजे यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले की, शासनाचा निधी परस्पर पूरग्रस्त मदतीसाठी वापरण्यात यावा. तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही आपल्या सामर्थ्यानुसार आर्थिक मदत, वस्तू, धान्य जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीत जमा करावी. संकटसमयी माणुसकीच्या भावनेतून पूरबाधितांसोबत खंबीरपणे उभे राहणे हीच खरी देशसेवा असल्याचे उदयनराजे यांनी नमूद केले आहे.

error: Content is protected !!