सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केली नसतानाही त्यासंबंधीचा बोगस रिपोर्ट मिळवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
गणेश प्रकाश घोरपडे (रा.निसराळे ता.सातारा), अजय संजय डुबल (रा.शिवाजीनगर), महेश रामचंद्र जाधव (रा.अंबवडे ता.सातारा), प्रमोद आनंदराव माने (रा.कुमठे ता.सातारा), हरिदास नाथा कुंभार (रा.नागझरी ता.कोरेगाव) या संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सिव्हीलचे डॉ.ज्ञानेशवर हिरास यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, ही घटना दि. १४ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत घडली आहे. संशयितांनी संबंधित कोरोना आरटीपीसीआर टेस्ट सातारा सिव्हील हॉस्पिटलमध्ये केल्याचा रिपोर्ट मिळवला. वास्तवीक त्यांनी सातारा सिव्हीलमध्ये टेस्ट केलेलीच नाही. ही बाब समोर आल्यानंतर त्याबाबतची चौकशी करण्यात आली. सिव्हील प्रशासनाने केलेल्या चौकशीमध्ये हे रिपोर्ट बोगस, खोटे असल्याचे समोर आले. या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दाखल घेतली असून पोलिसांकडून संशयितांकडे कसून चौकशी सुरु आहे. यात किती लोकांचा सहभाग आहे हे लवकरच स्पष्ट होईल
You must be logged in to post a comment.