सोन्याची डील रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसावर जीवघेणा हल्ला

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सोन्याचा बेकायदा व्यवहार रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. लोखंडी रॉडसह लाकडी दांडक्याने आरोपींनी पोलिसाला मारहाण केली. या मारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पेरले, ता. कराड गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी शनिवारी पहाटे आठजणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल मुकेश संभाजी मोरे हे शुक्रवारी रात्री त्यांच्या खासगी वाहनाने शासकीय कामानिमित्त सातारला निघाले होते. त्यावेळी पेरले गावच्या हद्दीत सोन्याची डिल होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीनुसार कॉन्स्टेबल मोरे संबंधित ठिकाणी पोहोचले. त्याठिकाणी चार संशयित त्यांना दिसले. कॉन्स्टेबल मोरे यांनी त्या चौघांना हटकले असता संशयितांनी शिवीगाळ दमदाटी करून लाकडी दांडके व लोखंडी रॉडने कॉन्स्टेबल मोरे यांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी जखमी कॉन्स्टेबल मोरे यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. शनिवारी पहाटे कोम्बिंग ऑपरेशन राबवून आठ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे घटनेविषयी सखोल चौकशी सुरू आहे.

error: Content is protected !!