सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : रहिमतपूर, ता.कोरेगाव येथील जुन्या पोस्ट ऑफिस पाठीमागे राहणार्या वृद्धेच्या घरात घुसून मारहाण करून चोरट्याने दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. याप्रकरणी रहिमतपूर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
संतोष ज्ञानदेव माने वय ४७ रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पार्वती साहेबराव माने रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रहिमतपुरातील रोकडेश्वर गल्ली येथील जुन्या पोस्ट ऑफिसच्या पाठिमागे पार्वती माने आणि पती साहेबराव माने हे वृध्द दांपत्य राहण्यास आहे. रविवारी साहेबराव माने हे घरातील वरच्या मजल्यावर आणि पार्वती माने या घराच्या हॉलमध्ये झोपले असता रात्री तीन च्या सुमारास घराचा दरवाजा जोरजोरात ढकलण्याचा आवाज आला. म्हणून पार्वती माने यांनी कोण आहे ? असे मोठ्या आवाजात विचारले असता कोण आहे काय विचारतेस म्हातारे असे म्हणत दरवाजा उघडुन दोन जण घरात घुसले.अंथरुणातुन उठलेल्या पार्वती माने यांना अंधुक प्रकाशात समोर संतोष माने असल्याचे दिसले. संतोष याने लाकडी दांडक्याने डोक्यास जोरदार मारहाण केल्याने पार्वती माने जखमी झाल्या आणि ओरडत खाली बसल्या. त्यानंतर संतोष माने याने दोनवेळा दांडक्याने पार्वती माने यांना मारहाण करत साथीदाराला बघतोस काय मंगळसुत्र खेच असे सांगत गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसुत्र चोरले व कपाटातील लॉकर उघडुन साहित्य चोरुन नेले अशी तक्रार पार्वती माने यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. जखमी पार्वती माने यांच्यावर सातारा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रहिमतपूरचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश कड, कोरेगावचे उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पाहणी करुन श्वानपथक यांच्या सहाय्याने तपास केला. ठसेतज्ञाची मदत घेण्यात आली. पोलिसांनी संशयीत संतोष माने याला अटक केले आहे. तपास पोलिस हवलदार भुजबळ करत आहेत.
You must be logged in to post a comment.