पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीवर हरीष पाटणे, चंद्रसेन जाधव

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): वृत्तपत्र क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती (अ‍ॅक्रीडेेशन) समितीवर पुणे विभागातून दै. ‘पुढारी’ साताराचे वृत्तसंपादक, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व दै. ग्रामोध्दारचे संपादक चंद्रसेन बापूसाहेब जाधव यांच्यासह पाच जणांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यासह राज्यातून अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र शासनाने मंगळवारी राज्यस्तरीय व विभागीय अधिस्वीकृती समितीची रचना करुन नियुक्ती आदेश काढले. या समितीवर पुणे विभागातून गेली 24 वर्षे पत्रकारितेत कार्यरत असलेले दै.‘पुढारी’ सातारा आवृत्तीचे वृत्तसंपादक व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष वसंतराव पाटणे, दै.ग्रामोध्दारचे चंद्रसेन बापूसाहेब जाधव, अमन सय्यद (पुणे), गोरख तावरे (कराड), सुमित भावेे(पुणे) या पाच जणांची नियुक्ती करण्यात आली.
हरीष पाटणे गेली 24 वर्षे सातारच्या पत्रकारितेत कार्यरत असून सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्यांबाबत त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. आक्रमक पत्रकारितेद्वारे समाजातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम ते प्रदीर्घ काळापासून करत आहेत. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकारांच्या हितासाठी अनेक कामे केली. कोरोनाच्या कालावधीत जिल्ह्यातील पत्रकारांसाठी जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा तसेच दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबांना संघटनेच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व किरण नाईक यांनी परिषदेच्यावतीने पुणे विभागीय समितीवर पाटणे यांची शिफारस केली. त्याला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली.

हरीष पाटणे, चंद्रसेन जाधव यांच्या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, दै. ‘पुढारी’चे चेअरमन योगेश जाधव, दै.‘पुढारी’चे साताराचे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, ग्रामोद्धारचे संपादक बापूसाहेब जाधव, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय माहिती उपसंचालक राजू पाटोदकर, उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस दिपक प्रभावळकर, परिषदेचे प्रतिनिधी सुजीत आंबेकर, प्रसिध्दीप्रमुख दिपक शिंदे, मराठी पत्रकार परिषदेची राज्य कार्यकारिणी व मराठी परिषदेची जिल्हा कार्यकारिणी, सातारा जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन, डिजीटल मीडिया परिषद व जिल्ह्यातील पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!