राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर

५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल ; आचारसंहिता लागू

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, ग्रामीण राजकारणाला नवी दिशा देणारी मोठी घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाने केली. राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाची ही घोषणा होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज मंगळवारी पार पडली. या परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसारच हा पहिला टप्पा जाहीर करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले. दरम्यान, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या इतर २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका नंतर दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आचारसंहिता आजपासून तत्काळ लागू झाली आहे. १६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अर्जांची छानणी २२ जानेवारी रोजी होईल आणि उमेदवारी माघारीची अंतिम तारीख २७ जानेवारी असणार आहे. अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप २७ जानेवारी दुपारी साडेतीन वाजेनंतर होईल.मतदान ५ फेब्रुवारीला तर मतमोजणी व निकाल ७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येणार आहे , असा निवडणूक कार्यक्रम असणार आहे.

या निवडणुकांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि त्या अंतर्गत असणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहे. जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसिलदारांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियु्क्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुका या निर्भय, मुक्त तसेच पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची सर्व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तसेच पर्यवेक्षक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

आरक्षणाचा तिढा; दुसऱ्या टप्प्यात उर्वरित निवडणुका

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काही जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने त्या जिल्ह्यांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली होती. न्यायालयाने आयोगाला १५ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसारच हा निवडणूक कार्यक्रम आखण्यात आला आहे.

महापालिकेनंतर ग्रामीण राजकारण तापणार

महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान व १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अशा वातावरणात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाल्याने राज्यातील ग्रामीण राजकारण तापणार असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक या टप्प्यात जाहीर झाल्याने प्रशासक राजवट संपून पुन्हा लोकप्रतिनिधींची सत्ता येणार आहे. जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून, सहकार, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी राहणार आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, त्याआधी मंगळवारी दिवसभर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये प्रशासकीय मान्यतांसाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. सायंकाळी चारनंतर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल १३५ विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती आहे. सर्व विभागांना यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून, आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी घेतला आहे.

सातारा जिल्ह्यात ६५ गट आणि पंचायत समितीच्या १३० गणांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यामध्ये कराड तालुक्यात सर्वाधिक १२ गट, सातारा तालुक्यात ८ आणि पाटण तालुक्यात ६ गट असल्याने या तीन तालुक्यांकडे महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे विशेष लक्ष केंद्रीत झाले आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीसह महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी राजकीय रणनीती गतिमान केल्या आहेत. भाजपकडून विशेषतः कराड उत्तर, कराड दक्षिण, सातारा व कोरेगाव या भागांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने प्रदेश पातळीवर आखणी सुरू आहे. शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनीही ताकद वाढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी वाई विधानसभा मतदारसंघात मागील महिन्यात तीन मेळावे घेतले असून, पुढील पंधरा दिवसांत दोन मोठ्या मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी तातडीने अर्ज दाखल करावेत, असे पक्षाकडून निर्देश देण्यात आले आहेत.

महापालिका निवडणुकांच्या प्रक्रियेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीची जिल्हा कार्यकारिणी बैठक बोलावली असून, त्यामध्ये निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. पाटण तालुक्यात शिंदे गटाने यापूर्वीच विविध मेळाव्यांतून वातावरण निर्मिती केली असून, यंदाही महायुती समन्वयाने निवडणुकांना सामोरे जाण्याबाबत पालकमंत्री आशावादी असल्याचे बोलले जात आहे.

सातारा जिल्हा परिषदेमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य राहिले असले, तरी नगरपालिका निवडणुकांतील यशानंतर भाजपने प्रथमच जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने कंबर कसली आहे. त्यामुळे यंदाची जिल्हा परिषद निवडणूक साताऱ्यातील राजकीय समीकरणे बदलणारी ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेदरम्यान ५ फेब्रुवारीपर्यंत बहुतांश प्रशासकीय कामकाज ठप्प राहणार असून, १० फेब्रुवारीनंतर पुन्हा नियमित कामकाज सुरू होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

error: Content is protected !!