वीज बिल माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साताऱ्यात रास्तारोको आंदोलन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लाॅकडाऊन काळातील दरमहा ३०० युनिट्सच्या आत वीज वापर झालेल्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची सहा महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करावी, या मागणीसाठी शुक्रवारी साताऱ्यात महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लाॅकडाऊन करण्यात आले होते. या काळातील वीजबिल माफ करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. यापूर्वीही अनेक आंदोलने करण्यात आली. शासनाने वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अद्याप पूर्तता केलेले नाही. यामुळे आज राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज कृष्णानगर येथील महावितरणच्या कार्यालयासमोरील सातारा-कोरेगाव रस्त्यावरच रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, विजय चव्हाण, मनोहर येवले व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.यामुळे महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. तसेच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

error: Content is protected !!