सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोना काळात नागरिकांना भरमसाठ आलेली वीज बिले माफ करण्यात यावीत या मागणीसाठी भाजपने राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. राज्यात जिल्ह्यांच्या ठिकाणी आणि महत्वाच्या शहरांत भाजपने आंदोलन सुरु केले. महाविकास आघाडीविरोधात घोषणा देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा येथील महावितरण कार्यालयाला टाळं ठोकलं आहे.
लॉकडाऊन काळात महाआघाडी सरकारने नागरिकांना वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र आता राज्य सरकारला त्याचा विसर पडल्याचा आरोप भाजपने केला आहे. आता त्या विरोधात भाजपने राज्यभर आंदोलन करुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आलं. जर वीज वसूली थांबवली नाहीतर यापुढेचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे व पदाधिकारी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.