साताऱ्यात लाइटच्या माळा लावताना पतीचा मृत्यू

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : दिवाळीच्या सणानिमित्त घरावर लाइटच्या माळा लावत असताना वीज वितरणच्या मुख्य लाइनला हात लागल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला तर पतीला वाचविताना पत्नी आणि त्यांची दोन मुलेही यात गंभीररीत्या भाजून जखमी झाली आहेत. ही दुर्देवी घटना साताऱ्यातील मोरे काॅलनीमध्ये शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

सुनील तुकाराम पवार (वय ४२) असे शाॅक लागून मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. तर मनिषा पवार आणि त्यांची दोन मुले श्रवण आणि ओम हे दोघेही भाजून जखमी झाली आहेत. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे घरोघरी विद्यूत रोषणाइ करण्यात येत आहे. पवार कुटुंबीय सुद्धा शनिवारी सायंकाळी घराच्या दुसऱ्या मजल्यावर लाइटच्या माळा लावत होते. त्यांच्या घराजवळूनच वीज वितरणची मुख्य लाइन गेली आहे. या लाइनच्या तारेला सुनील पवार यांचा चुकून हात लागला. त्यामुळे ते तारेला चिकटले. हा प्रकार लक्षात येताच पत्नी मनिषा यांनी त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्याही त्यांना चिकटल्या. त्यांची दोन्हीही मुले श्रवण आणि ओम हे सुद्धा आई वडिलांच्या मदतीसाठी धावून आले असता त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये हे चाैघेही गंभीररीत्या भाजून जखमी झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना तत्काळ साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच सुनील पवार यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी मनिषा आणि मुले श्रवण, ओम यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरू केले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा करत होते. ऐन दिवाळीच्या सणातच पवार कुटुंबावर ओढावलेल्या संकटामुळे साताऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!