सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वीजमीटरमध्ये फेरफार करुन वीजचोरी करणाऱ्या सातारा शहर व ग्रामीणमधील १० औद्योगिक ग्राहकांची वीजचोरी महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणली असून, या चोरांना ३ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. भरारी पथकाच्या या धाडसी कारवाईने वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
पुणे, कोल्हापूर, बारामती, सोलापूर व सातारा येथील भरारी पथकाने एकत्रित कारवाई करुन १० मोठ्या उद्योगांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. काही ठिकाणी ३ वर्षांपासून मीटरमध्ये फेरफार करुन वीजचोरी सुरु होती. परंतु, महावितरणच्या भरारी पथकाने या चोरीचा पर्दाफाश केला आहे. सातारा शहरातील ८ व नागेवाडी येथील २ अशा दहा ग्राहकांचा यात समावेश आहे. त्यांनी तब्बल १४ लाख ४७ हजार १०६ इतक्या युनीटचा वापर चोरुन केला होता. या वीजचोरीपोटी त्यांना १ कोटी ९४ लाख ८४ हजार तर तडजोड शुल्कापोटी १ कोटी ३८ लाख २० हजारांचे वीजबील दिले आहे. दोन्ही मिळून ही रक्कम ३ कोटी ३३ होते. तर यामध्ये अजून दोन ग्राहकांच्या रकमेची भर पडणार आहे. या सर्वांवर विद्युत कायदा २००३ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येत आहे.
ही वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी सुरक्षा व अंमलबजावणी परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांचे मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता उज्जवला लोखंडे, दीपक कोथले, राकेश मगर, सुरेश जोगी व महेशकुमार राऊत यांचेसह त्यांच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.
You must be logged in to post a comment.