नामकरणातून सातारकरांचे विचारप्रबोधन करा; महारूद्र तिकुंडे यांची मागणी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या, क्रांतिकारकांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांची नावे बदलून त्यांना सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भ मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा शहरातील पारंगे चौकाचे ‘माहिती अधिकार चौक’, जुन्या आरटीओ चौकाचे ‘संविधान चौक’ तर वाढे फाटा ते पोवई नाका दरम्यानच्या मार्गाचे ‘शिवतीर्थ मार्ग’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी युवा राज्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी सातारा नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणीस शहरातील नागरिक, विविध संघटना आणि युवा वर्गाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, सदर नामांतरामुळे केवळ जागांची नावे नव्हे, तर त्या माध्यमातून कायदा, लोकशाही मूल्ये आणि इतिहास यांची जाणीव जनमानसात कायम राहील, असे मत व्यक्त होत आहे.
माहिती अधिकार कायदा हा सामान्य नागरिकांसाठी प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणारे प्रभावी साधन आहे. मात्र, या कायद्याबाबत समाजात पुरेशी जनजागृती नसल्याचे चित्र दिसून येते. अशा परिस्थितीत पारंगे चौकाला ‘माहिती अधिकार चौक’ असे नाव दिल्यास नागरिकांना वेळोवेळी या कायद्याचे महत्त्व आणि उपयोग लक्षात राहील, असा विश्वास तिकुंडे यांनी व्यक्त केला आहे.त्याचप्रमाणे, संविधान हा भारताचा पवित्र ग्रंथ असून तो सर्वसामान्य, गरीब, वंचित, दुर्बल घटकांना न्याय देणारे मार्गदर्शन आहे. त्यामुळे जुन्या आरटीओ चौकाला ‘संविधान चौक’ असे नाव दिल्यास लोकशाही मूल्यांचा सन्मान होईल आणि सर्व नागरिकांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता वाढेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
वाढे फाटा ते पोवई नाका हा मार्ग शहरातील प्रमुख वर्दळीचा असून, पोवई नाक्यावर आठ रस्त्यांच्या संगमावरील ‘शिवतीर्थ’ हे स्मारक सातारकरांसाठी श्रद्धास्थान बनले आहे. या पार्श्वभूमीवर, या संपूर्ण मार्गाचे ‘शिवतीर्थ मार्ग’ असे नामकरण करण्यात आले, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव होईल आणि त्यांच्या विचारांचा प्रसार व्यापक स्वरूपात जनतेपर्यंत पोहोचेल, असेही तिकुंडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, युवा राज्य फाऊंडेशन या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करत असून, लवकरच शहरात जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे युवा राज्य फाउंडेशनकडून सांगण्यात आले आहे . शहरातील विविध स्तरातून या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, सातारा नगरपालिकेने सदर मागणीची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“चौक आणि रस्त्यांना नावं देणं ही केवळ औपचारिकता नसून, ती जनतेला त्यांच्या अधिकारांची आणि आपल्या इतिहासाची जाणीव करून देणारी प्रेरणा असते. माहिती अधिकार, संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य जनमानसात सतत जागं राहावं, यासाठीच आम्ही ही मागणी केली आहे.”
- महारूद्र तिकुंडे, अध्यक्ष, युवा राज्य फाउंडेशन, महाराष्ट्र.

You must be logged in to post a comment.