सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लोणी काळभोर ता. पुणे येथील महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलेल्या पर्यटक दाम्पत्यावर रविवारी सकाळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात २८ वर्षीय उद्योगपती व त्याची पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांच्या गाडीचीही तोडफोड करून हल्लेखोर पसार झाले.
याबाबत माहिती अशी की, लोणी काळभोर येथील उद्योगपती दाम्पत्य तीन दिवसांपूर्वी महाबळेश्वरला फिरायला आले होते. महाबळेश्वर येथील गणेश नगर हौसिंग सोसायटीमधील एका बंगल्यात ते उतरले होते. या दाम्पत्याचा मोटार सायकलवरून दोन व्यक्ती गेली दोन दिवसांपासून पाठलाग करीत होते. शनिवारी हे दाम्पत्य कोकणात गेले होते. तेथेही मोटार सायकलस्वार हे या दाम्पत्याचा पाठलाग करीत होते. रविवारी सकाळी हे दाम्पत्य बंगल्याच्याजवळ असलेल्या एमपीजी क्लब येथे स्पासाठी निघाले होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या दोन मोटार सायकलस्वारांनी उद्योगपतीच्या गाडीच्या पुढील काचेवर रॉड मारून गाडी थांबविली. हल्लेखोरांनी गाडीतून उद्योगपती व त्याच्या पत्नीला बाहेर काढून त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात उद्याेगपती यांना मुका मार लागला तर पत्नीच्या पायाला जखम झाली. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले.
You must be logged in to post a comment.