तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना : जिल्हाधिकारी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे स्थापन करण्यात आले आहे. या कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर आलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज निवेदने इत्यादींवर कार्यवाही करण्यात येणार आहे, या कक्षाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत केले.

मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालयाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी बोलत होते. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे उपस्थित होते.

मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालयाचे नोडल अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी असणार आहेत, असे सांगून जयवंशी म्हणाले, या कक्षाला पुरेसे अधिकारी व कर्मचारीही देण्यात आले आहेत. नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींना युनिक कोड देण्यात येणार आहे. ही कार्यवाही संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मंत्रलायस्तरावर अर्जाच्या प्रगतीबाबत लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्याही कामासाठी मंत्रालयस्तराव जाण्याची आवश्यकता भासणार नाही आता जिल्ह्यातच त्यांचे प्रश्न सोडविले जातील. जे प्रश्न सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल असे प्रश्न मंत्रालय स्तरावर पाठविण्यात येणार आहेत. तसेच जे प्रश्न सोडविता येणार नाहीत कारणांसह त्यांना लेखी कळविण्यात येणार आहे.

हा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे.सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न शासनस्तरावर असलेली कामे त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज व निवेदने याबाबत अधिकाधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याचा शासनाचा उद्देश असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!