एवढा मोठा जिल्हा आणि फक्त सहा व्हेंटिलेटर ?


सातारा दौर्‍यावर आलेल्या प्रवीण दरेकर यांचा सरकारला सवाल

 सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातार्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एवढ्या मोठ्या जिल्ह्यासाठी येथील शासकीय रुग्णालयात फक्त सहा व्हेंटिलेटर असणे ही लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.


कोरोनाविषयक परिस्थितीची माहिती घेण्यासाठी सातारा जिल्हा दौर्‍यावर आले असताना पाहणी दरम्यान दरेकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सातार्‍यातील सिव्हिल हॉस्पिटल, कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज आणि क्वारंटाईन सेंटरना भेट देऊन पाहणी केली तसेच शिरवळ तपासणी नाक्यावरील व्यवस्थाही पाहिली. या पाहणीनंतर बोलताना ते म्हणाले, ’जिल्ह्यात 40 टक्के मनुष्यबळाचा अभाव आहे. कोरोनाविषयक परिस्थिती हाताळण्यासाठी मुळात ज्या प्रमुखाची गरज आहे तो मूळ फिजिशियनच इथे उपलब्ध नाही. शासकीय रुग्णालयात 10 ते 12 डॉक्टर यांची कमतरता आणि 40 टक्के नर्सेसचा अभाव असल्याने  मी स्वतः मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी यासंदर्भात बोलून या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’एवढा मोठा जिल्हा असूनही येथील शासकीय रुग्णालयात फक्त सहा व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, ही खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

‘कलेक्टर साहेब, यंत्रणा सक्षमतेने कामाला लावा !’
शिरवळ क्वारंटाईन सेंटर येथे पाहणी करताना अनेक त्रुटी आढळून आल्याचे दरेकर यांनी सांगितले. कुठे स्वच्छतागृहात दुर्गंधी आढळून आली तर कुठे दूध, गरम पाणी, नाश्ता वेळेत मिळत नाही अशी महिलांची तक्रार कानावर आली. हे सर्व पाहिल्यावर एकूणच प्रशासनाकडे संवेदनशीलतेची कमतरता दिसून आली, असे मत दरेकर यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, जिल्ह्यात मास टेस्टिंग होणे गरजेचे असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सक्षमतेने कामाला लावा, अशा सूचना आपण जिल्हाधिकारी आणि आरोग्य खात्याच्या संबंधित अधिकार्‍यांना केल्या आहेत, असेही दरेकर म्हणाले.

कुणाला तरी झटका येतो आणि लॉकडाऊन होतो..!
आज संपूर्ण महाराष्ट्रात कुणा तरी एकाला झटका येतो आणि लॉकडाऊन होतो, अशी परिस्थिती आहे. कलेक्टरना वाटलं की केला लॉकडाऊन, पालकमंत्र्यांना वाटलं की केला लॉकडाऊन ! लोकप्रतिनिधींना विचारात न घेता आणि स्वयंसेवी संस्था तसेच जनतेचा कानोसा न घेता अचानक जाहीर केल्या जाणार्‍या या लॉकडाऊनमुळे लोकांवर उपाशी राहाण्याची वेळ आली आहे, हे या सरकारला कधी समजणार, असा सवाल दरेकर यांनी केला.

‘आम्ही मंत्रालयात आणि मुख्यमंत्री घरात !’
कोरोनाविषयक परिस्थिती असो किंवा लॉकडाऊनबाबतचा निर्णय असो, सरकार विरोधी पक्षाला अजिबात विश्वासात घेत नसल्याचे दरेकर यांनी सांगितले. या कोरोनाकाळात विरोधी पक्षासोबत मंत्रालयात फक्त एक बैठक झाली तीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे; त्यावेळी आम्ही मंत्रालयात आणि मुख्यमंत्री घरात, अशी ती बैठक होती. एकूणच संपूर्ण व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यात समन्वयच राहिला नसल्याचे मत दरेकर यांनी यावेळी मांडले.
error: Content is protected !!