मृत्यूनंतरही डॉ. हर्षे ठरताहेत नव्या आदर्श प्रथेचे नंदादीप

नदीत विसर्जनाऐवजी अस्थी जमिनीत पुरून त्यावर कुटुंबियांनी केले वृक्षारोपण

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्याच्या आरोग्य सेवा क्षेत्रातील सुप्रसिद्ध धन्वंतरी व आयुर्वेदिक अर्कशाळेसह विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा जपणारे डॉ. रवींद्र हर्षे हे त्यांच्या मृत्यूनंतरही नव्या प्रथा निर्माण करणारे आदर्श व्यक्तिमत्व ठरत आहेत.अंत्यविधीनंतर त्यांच्या अस्थी नदीमध्ये विसर्जित करण्याऐवजी त्यांच्या कुटुंबीयांनी स्मशानभूमी लगत एका खड्ड्यात पुरून त्यावर वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपणारा आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. हर्षे कुटुंबीयांची डॉक्टरांच्या स्मरणार्थ राबवलेली ही कृती निश्चितच वंदनीय आणि अनुकरणीय असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे.

साताऱ्याच्या वैद्यकीय व्यावसायिक क्षेत्रात संयमी, मितभाषी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असणारे डॉ. रवींद्र हर्षे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवारी दिनांक २३ एप्रिल रोजी सांगली येथे निधन झाले. श्री. हर्षे हे जुन्या काळातील संवेदनशील व प्रथितयश फिजिशियन म्हणून संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचित होते. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाच्या बरोबरीनेच सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रातही ते नावाजलेले व्यक्तिमत्व होते. साताऱ्यातील शतकी परंपरा असलेल्या आयुर्वेदिक शाळेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. समाजसेवेच्या विविध उपक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असे.मार्क्सवादाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी कधीच कोणत्याही कर्मकांडांचा पुरस्कार केला नाही.

दोन दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाल्यानंतर साताऱ्यातील संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र आपल्या मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारची कर्मकांडे करू नयेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. हे लक्षात ठेवून त्यांचे सुपुत्र अनिकेत आणि कन्या डॉ. गीता यांनी दहनानंतर सर्व अस्थी एकत्रित केल्या व श्री बालाजी चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्याशी चर्चा करून डॉक्टरांच्या अस्थी नदीमध्ये विसर्जित करण्याऐवजी तेथील परीसरातच एका खड्ड्यात पुरून त्यावर वृक्षारोपण करीत डॉ. हर्षे यांच्या स्मृती वृक्षाच्या रूपाने अखंडित ठेवण्याचा प्रयत्न केला.

सातारा शहर व परिसरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून ठिकठिकाणचे अनेक रुग्ण उपचारासाठी डॉक्टर हर्षे यांच्याकडे येत असत. केवळ फिजिशियनच नव्हे तर आपुलकीचा सल्ला देणारे वडीलधारी व्यक्तिमत्व म्हणून आपल्या सुखदुःखात त्यांचा अनेकांना आधार वाटत असे. गोरगरिबांपासून ते राजकीय नेते मंडळी व अधिकाऱ्यांपर्यंत विविध स्तरातील रुग्ण वैद्यकीय सल्ल्यासाठी त्यांच्याकडे येत असत. अत्यंत शांत मनमिळावू आणि कायम रुग्णांना मदत करणारे ‘धन्वंतरी’अशीच त्यांची ख्याती होती.

वयोमानपरत्वे त्यांचे निधन झाले असले तरी त्यांच्या अस्थीच्या साक्षीने वाढणारा वृक्ष, सावली देण्याबरोबरच पर्यावरण समतोल राखणारा आदर्श दीपस्तंभ ठरेल अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थी नदीमध्ये विसर्जित करून तेच पाणी पुन्हा पिण्यासाठी वापरणे. या प्रथेऐवजी मातीत मिसळलेल्या अस्थिरुपी खताच्या आधाराने बहरणारा वृक्ष,मृत व्यक्तीच्या आठवणी बरोबरच पर्यावरण संतुलन राखणारा नंदादीपच ठरतो. हेच हर्षे कुटुंबीयांच्या कृतीतून सिद्ध होत आहे. मृत्यूनंतरही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या आदर्श धन्वंतरीला त्रिवार सलाम.

error: Content is protected !!