सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लडाख येथे लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडले. यात वीरमरण आलेल्या सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांच्या पार्थिवावर आज विसापूर (ता. खटाव) इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी, तसेच शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील हजारोंचा जनसागर लोटला होता. सुरुवातीला पार्थिव घरी पोचताच विजय शिंदे यांच्या कुटुंबीय, नातेवाइकांनी हंबरडा फोडला. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील खासदार श्रनिवास पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव तहसीलदार किरण जमदाडे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर विजय शिंदे यांची सजविलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. दरम्यान, संपूर्ण गावातील रस्त्यांवर आकर्षक रांगोळी, पुष्पवृष्टी करण्यात आली.
वीर जवान विजय शिंदे अमर रहे चे चौका-चौकात फ्लेक्स बोर्ड मोठ्या संख्येने लावण्यात आले होते. विजय शिंदे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात विजय यांना अखेरचा निरोप देण्यात आला. बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देत, शासकीय इतमामात सुभेदार विजय शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूपश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.
You must be logged in to post a comment.