अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबई, ( भूमिशिल्प वृत्तसेवा) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याबद्दल घोषणा केली आहे.


राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती दिली. ‘मुंबई हायकोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांनी स्वत: हुन राजीनामा दिला आहे. ते लवकरच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत’, असं नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
दरम्यान, त्याआधी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात पोहोचले आहे. त्याआधी शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि शरद पवारांची बैठक झाली. या बैठकीला सुप्रिया सुळे या सुद्धा हजर होत्या.


परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तसंच परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका तर डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका या सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करतांना असे म्हटले होते की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी.दरम्यान,या खटल्याची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलिस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. अशा वेळी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे. सीबीआयने 15 दिवसांंत सदर प्रकरणाची चौकशी करून न्यायालयात प्राथमिक अहवाल सादर करायचा आहे.

error: Content is protected !!