सातारा जिल्हा रुग्णालयात शॉर्टसर्किटने आग

काळजीचे कारण नसल्याचा जिल्हा शल्यचिकित्सकांचा निर्वाळा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या कॅज्युअलटी विभागातील पोर्चमध्ये असणाऱ्या मीटर बॉक्समध्ये पाणी जाऊन शनिवारी रात्री साडेनऊ वाजता शॉर्टसर्किट झाले.त्यामुळे तेथे आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.या संदर्भात जिल्हा रुग्णालयाचे जिल्हाशल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी तत्काळ घटना स्थळाची पाहणी करून कोणतीही मोठी घटना घडलेली नसल्याचे सांगून आग नियंत्रणात आणली आहे असा स्पष्ट निर्वाळा दिला.

सातारा शहरांमध्ये गेल्या दोन दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाने जोर पकडला आहे .शनिवारी सुद्धा साताऱ्यात पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत कायम होता. रात्री साडेनऊच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या विभागासमोर असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये एका मीटर बॉक्समध्ये पाणी जाऊन अचानक शॉर्टसर्किट झाले .त्यामुळे मीटर बॉक्सच्या बाहेर ठिणग्या उडून तेथे आग लागली आग लागल्याचे वृत्त कळताच तेथील आरोग्य विभागातील कर्मचारी डॉक्टर यांची एकच पळापळ झाली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाला तात्काळ प्राचारण करण्यात आले . मात्र तत्पूर्वी बाह्य रुग्णविभागातील काही डॉक्टर आणि वॉर्ड बॉयनी अग्निशमन यंत्राच्या आधारे ही आग तत्काळ विझवली.

मीटर बॉक्सच्या लगतचा एमसीबी चा खटका पाडून काही काळ रुग्णालय परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते.परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. अग्निशमन दलाचे वाहन पोहोचण्यापूर्वीच आग आटोक्यात आली होती.

दरम्यान जिल्हा रुग्णालयातील सर्व मीटर बॉक्स तातडीने सुरक्षित करण्यात येतील असे आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.युवराज करपे यांनी दिले.

error: Content is protected !!