सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : यंदाचा गळीत हंगाम सुरू होत असून अद्याप अनेक कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी देण्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही तसेच अद्याप किसनवीर, शरयू व जरंडेश्वर कारखान्यांनी अद्याप मागील हंगामातील संपूर्ण रक्कम अदा केलेली नाही. जो पर्यंत मागील हंगामातील थकीत रक्कम अदा केली जाणार नाही व येत्या हंगामातील एक रक्कमी एफआरपी देण्याबाबत भूमिका स्पष्ट केली जाणार नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
शेतकऱ्यांना गृहीत धरून कारखानदारांनी यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्याप कायद्यानुसार १४ दिवसाच्या आत एक रक्कमी एफआरपी देण्याबाबत कारखान्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. ही बाब अन्यायकारक असून त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कारखानदार अन् साखर आयुक्त यांनी एक रक्कमी एफआरपी देण्याबाबत भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. तसेच अद्याप मागील वर्षीच्या गळीत हंगामात घालण्यात आलेल्या ऊसाची एफआरपी प्रमाणे पेमेंट किसनवीर, शरयू व जरंडेश्वर कारखान्यांनी अदा केलेले नाही. ते पेमेंट जोपर्यंत अदा केले जाणार नाही अन् यंदाच्या गळीत हंगामातील एक रक्कमी एफआरपी देण्याबाबत कारखानदार भूमिका स्पष्ट करणार नाहीत तो पर्यंत कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा साबळे यांनी दिला आहे.
You must be logged in to post a comment.