सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकरी सभासद, कामगार व तोडणी वाहतूक यंत्रणेसाठी सुरू राहणे महत्त्वाचे आहे. सद्य:स्थितीत कारखाना आपण जप्त केला असून, याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी कारखान्याच्या संस्थापक-संचालक मंडळाच्या सदस्यांनी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडे केली आहे.
कारखान्याच्या संस्थापिका, माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील, व्हाईस चेअरमन शंकरराव भेसले-पाटील, संचालक दत्तात्रय धुमाळ, श्रीरंग सापते, शहाजी भोईटे, अक्षय संजय बर्गे व कार्यकारी संचालक किसनराव घाडगे यांनी शुक्रवारी दुपारी मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात सहसचिव यांची भेट घेतली आणि त्यांना कारखान्याबाबत निवेदन सादर केले.सद्य:स्थितीत कारखाना सुरू करावयाचा झाल्यास आर्थिक कारण पुढे येणार आहे. त्यामुळे ईडीमार्फत कारखाना सुरू करावा अथवा एखादी आर्थिक सक्षम असणारी संस्था बरोबर घेऊन सभासदांच्यावतीने कारखाना सुरू करण्याबाबत परवानगी देण्यात यावी. जेणेकरून गळीत हंगाम २०२१-२२ गळितासाठी नोंद असणारा ऊस गळीत करता येईल, तसेेच कामगार ही कामावर राहतील, तोडणी वाहतूक यंत्रणेस काम मिळेल, याबाबत आपल्याकडून मार्गदर्शन करावे, असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. निवेदनामध्ये कारखान्याच्या विषयाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.