सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खा. उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सातारा पालिकेवर एकहाती सत्ता होती. मात्र नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या कामकाजावर स्वकीयही नाराज होते. त्यामुळे माधवी कदम, साविआ आणि खा. उदयनराजे यांच्यात दुरावा निर्माण झाला असून आज माधवी कदम यांनी पती डॉ. संजोग कदम यांच्यासोबत आ. शिवेद्रसिंहराजे भोसले यांची सुरुची बंगल्यावर भेट घेतल्याने उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का मानला जात आहे.
गेली दहा वर्षे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनोमिलन करण्यासाठी सातारचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांनी प्रयत्न केला परंतु नगरपालिकेच्या तोंडावर मागील पाच वर्षांपूर्वी विविध कारणांतून नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. त्यातून नगराध्यक्षपदासाठी नगरविकास आघाडीने आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची पत्नी सौ वेदांतिकाराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. त्याचवेळी सर्व महत्वाची पदे राजघराण्यातील राजकारण्यांना नको ही भूमिका घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वसामान्य घरातील उमेदवार म्हणून माधवी कदम यांना उमेदवारी दिली. त्यांना सातारकरांनी भरघोस मतांनी निवडून दिले.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा नगरपालिकेत माधवी कदम यांनी साडेचार वर्ष चांगल्या पद्धतीने काम केले परंतु शेवटच्या टप्प्यात सातारा विकास आघाडीतील ज्येष्ठ नगरसेवकांच्या नाराजीमुळे माधवी कदम आणि सातारा विकास आघाडी यांच्यामध्ये विसंवाद सुरू झाला त्यातून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न ही झाला. यामध्ये माधवी कदम यांच्याबद्दल खासदार उदयनराजे यांच्या मनात नकारात्मकता आणण्यात ज्येष्ठ नगरसेवक यशस्वी झाले. त्यामुळे शेवटच्या सहा महिन्यांत पालिकेत असून नसल्या सारख्याच होत्या. कारण शेवटच्या सहा महिन्यात पालिकेचा कारभार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आणि ज्येष्ठ नगरसेवक करत होते. तसेच सातारा विकास आघाडीकडून सुरू असलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमास माधवी कदम दिसत नव्हत्या.
सध्या खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात शाब्दिक युध्द पहायला मिळत आहे. विविध कारणावरुन दोन्ही राजे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यात आज माजी नगराध्यक्षा माधवी कदम, डॉ. संजोग कदम यांनी शिवेद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतल्याने उदयनराजे भोसले यांना धक्का मानला जात आहे.
You must be logged in to post a comment.