सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पिस्तुलांसह जिवंत काडतुसांची तस्करी करणाऱ्या कऱ्हाडच्या चौघांना जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलिसांनी गजाआड केले. चोपडा ते शिरपूर मार्गावर बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून सहा गावठी बनावटीची पिस्तूल, तीस जिवंत काडतुसे, तसेच महागडी कार असा ३७ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
गणेश ऊर्फ सनी सुनील शिंदे (वय २५, रा. ओगलेवाडी, ता. कऱ्हाड), मोहसीन हनिफ मुजावर (३०, रा. युवराज पाटील चौक, मसूर, ता. कऱ्हाड), रिजवान रज्जाक नदाफ (२३, रा. शिवाजी चौक, मलकापूर-कऱ्हाड) व अक्षय दिलीप पाटील (२८, रा. रविवार पेठ, कऱ्हाड) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, तर त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चोपडा-शिरपूर मार्गावरून बुधवारी रात्री अवैध शस्त्रांची तस्करी होणार असल्याची माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून रात्री पोलिसांनी या मार्गावर एस्सार पेट्रोल पंपानजीक सापळा रचला. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संशयित कार या मार्गावरून जाताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी ती कार अडविली असता संबंधित कारमध्ये चौघेजण आढळले.
पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे सहा गावठी बनावटीची पिस्तूल आणि तीस जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता, कऱ्हाडातील सूरज विष्णू साळुंखे याच्या सांगण्यावरून हे चौघेजण चोपडा येथे पिस्तूल खरेदीसाठी आले असल्याचे पोलिसांना समजले. तसेच मध्य प्रदेश राज्यातील वारला तालुक्यात असलेल्या पारउमर्टी गावातील सागर सरदार नामक व्यक्तीकडून त्यांनी या सहा पिस्तूल व काडतुसे खरेदी केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांसह कऱ्हाडातील सूरज साळुंखे आणि सागर सरदार या दोघांवर चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
You must be logged in to post a comment.