सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सुरूर (ता. वाई) येथील जक्कल रंगा काळे याने मोहडेकरवाडी, सुरूर-बेघरवस्ती आणि धावजी पाटील मंदिराला येणार्या महिला भाविकांवर हल्ला करीत लूटमार करण्याच्या उद्देशाने तिक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केले. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जाणवे-खराडे या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर परिसरातील तरुणांनी त्याला पकडण्यासाठी फिल्मी स्टाईलने त्याचा पाठलाग केला परंतू तो अंधाराचा फायदा घेत शेतांमध्ये लपण्यात यशस्वी झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सुरूर (ता. वाई) येथे गेली अनेक वर्षे राहणार्या पारधी वस्तीमधील जक्कल रंगा काळे (वय 45) याने दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सुरूर एसटी स्टँडवर मुंबई येथे जाण्यासाठी निघालेल्या बांदल या इसमावर त्याच्या पत्नी व मुलांच्या समोरच लुटमार करण्याच्या उद्देशाने हल्ला करीत त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. भितीने ते गाडीतून खाली न उतरता त्याच गाडीत बसून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तसेच जक्कल काळे याने आजच दुपारच्या सुमारास सुरूर येथील बेघरवस्तीमधील एकावर वार करून त्यालाही जखमी केले आहे. सुरूर येथे असलेले धावजीपाटील मंदिर राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असून या ठिकाणी रविवार, अमावस्या व पौर्णिमेला भाविकांची गर्दी होते त्यामुळे आजही (रविवार) काही महिला देवदर्शनासाठी आल्या होत्या. त्यांना लुटण्याच्या उद्देशाने जक्कल काळे याने त्यांच्यावरही हल्ला करीत धारदार शस्त्राने वार केले. सदर महिला भयभित होवून आरडा ओरडा करीत पळून जाण्यात यशस्वी झाल्या.
भयभित झालेल्या या महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार न देता आपल्या गावी घराकडे निघून गेल्या. या घटणेची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी मोहडेकरवाडी, वेळे, केंजळ, सुरूर परिसरातील गावांमधील नागरिकांना दिली. अनेक गावातील तरुणांनी सुरूर गावाकडे धाव घेतली. यावेळी अंदोजे 250 तरुणांनी जक्कल काळे याला पकडण्यासाठी जमाव केला. हा जमाव पारधी वस्तीवर कुच करून गेला. जमाव येत असल्याचे पाहून जक्कल काळे याने धूम ठोकली. तब्बल दोन तास सिनेस्टाईल पध्दतीने 250 ते 300 तरुणांच्या जमावाने त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
पडलेल्या अंधाराचा फायदा घेवून परिसरातील ऊस व ज्वारीच्या पिकांच्या आडोशाने तो तरुणांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला. यामुळे तरुणांचा जमाव पुन्हा माघारी आला. यावेळी सुरूर येथील भैरवनाथ मंदिरात वेळे, केंजळ, सुरूर येथील ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन केले. वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जाणवे -खराडे, भईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पीएसआय मोरे, भंडारी व पोलीसांच्या उपस्थितीत तब्बल दोन तास बैठक घेण्यात आली. यावेळी पारधी समाजाची हकालपट्टी करण्याची मागणी या बैठकीत संतापलेल्या नागरिकांनी पोलीस प्रशासनासमोर पारधी समाजापासून होणारा त्रासाचा पाढा वाचून दाखविला व त्यावर तोडगा काढण्यासाठी पारधी समाज तडीपार करावा अशी मागणी केली. गेली अनेक वर्षापासून या पारधी समाजाने सुरूरसह परिसरातील गावांमधील नागरिकांवर मोठया प्रमाणावर दहशत माजवित हा समाज नागरिकांना त्रास देत आहे. यामुळे त्यांचा बंदोबस्त पोलीस प्रशासनाने करावा अशी मागणी करण्यात आली.
You must be logged in to post a comment.