सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शासनाने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याचे सांगितले असून जे अॅपवर नाव नोंदविणार त्यांनाच लस असे शासनाचे धोरण आहे. या धोरणामुळे तळागाळापर्यंत ही मोहिम पोहचणार नाही. यासाठी कोरोना लस ही प्रत्येक नागरिकास मोफतच दिली जावी. तसेच ही मोहीम युध्द पातळीवर राबवावी, अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोनाने डोके वर काढले असून आरोग्य सेवासुविधा न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संपूर्ण व कायमच्या उच्चाटनासाठी लसीकरण मोहीम प्रभावी राबविण्याची गरज आहे. मात्र, लसीकरण केंद्रांची संख्या अल्प असल्याने लसीकरणासाठी गर्दी होत आहे. यासाठी निदान संघटनेच्यावतीने आमच्या परिसरातील १०० % नागरिकांच्यात लसीकरण व्हावे, यासाठी आवश्यक त्या साधन सामुग्रीयुक्त ठिकठिकाणी जागेची उपलब्धता तयार करु इच्छितो. त्यासाठी वैद्यकिय पथक दिल्यास त्याप्रमाणे आम्हास नियोजन करणे सोयीस्कर होईल. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष विजय देशपांडे यांच्यासह सचिव, कार्याध्यक्ष आदींच्या स्वाक्षऱ्या असून सदर निवेदनाच्या प्रती कार्यवाहीसाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री,जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषद अध्यक्ष, सातारा नगरपरिषद अध्यक्ष यांनाही देण्यात आल्या आहेत.
You must be logged in to post a comment.