ढोल, ताशा, नगारा वाजे… बाबाराजे, बाबाराजे!
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : मंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच मातृभूमीकडे येताना नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा नागपूरपासून रविवारी सकाळी सुरू झालेला प्रवास आणि शुभेच्छांचा सिलसिला सलग १७ तासांनी रात्री दीड वाजता साताऱ्यातील शुक्रवार पेठेत सुरूची बंगल्यात विसावला. समर्थक कार्यकर्ते व हितचिंतकांच्या शुभेच्छांच्या वर्षावाने चिंब भिजताना हारतुरे, मिरवणुका, सत्कार, नमस्कार, हस्तांदोलन अशा भरगच्च कौतुकाला सामोरे जाताना बाबाराजेंचा टिकून राहिलेला टवटवीतपणा आणि प्रसन्नता सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला.
विधानसभा सदस्यत्वाचा पंचकार मारणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना यंदाच्या निवडणुकीत एक लाख ४२ हजार १२४ इतके राज्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळाले. त्यामुळे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून त्यांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित होते. तसे झालेही. गेल्या आठवड्यात त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथही घेतली. तर शनिवारी सायंकाळी मंत्र्यांच्या झालेल्या खातेवाटपात त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले.
नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे कामकाज संपल्यावर रविवारी ते जिल्ह्यात येणार हे निश्चित होते. त्यानुसार रविवारी सकाळी आठ वाजता नागपूरहून पुण्याकडे विमानाने निघाले. पुण्यात सकाळी दहाच्या सुमारास दाखल झाल्यानंतर पुणे विमानतळापासूनच त्यांच्या स्वागताची श्रृंखला सुरू झाली. शुभेच्छा स्वीकारत पुण्यातून मोटारीने शेकडो कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासह निघालेली रॅली दुपारच्या दरम्यान सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये शिरवळ येथे पोचल्यानंतर त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. हारतुरे, पुष्पवृष्टी व जेसीबीने पुष्पहार घालून त्यांचे अनोख्या पद्धतीने अभिष्टचिंतन करण्यात आले. त्यानंतर महामार्गावरच्या प्रत्येक गावात त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्ते, नागरिकांनी गर्दी केली होती.
जावली तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनेवाडी पासून त्यांची कर्मभूमी असलेल्या मतदारसंघात त्यांनी आगमन केले. त्यानंतर कुडाळ, करहर, मेढा आदी ठिकाणीही त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सजवलेली जीप गाडी, सुशोभित बैलगाडी आदींमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.
रात्री उशिरा मोळाचा ओढा येथून ते सातारा शहरात प्रवेशकर्ते झाले. रात्री १२ वाजता शाहू स्टेडियम, बस स्थानकमार्गे पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. शिवतीर्थ परिसरात समर्थक कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी व जेसीबीद्वारे भलेमोठे पुष्पहार घालून त्यांचा कौतुक सोहळा केला. त्यानंतर सातारा नगरपालिकेसमोरील यशवंत उद्यानात असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुन्हा पोवई नाक्यावरील व्यापारी मंडळींच्या शुभेच्छा स्वीकारल्या तदनंतर ते राजवाडा परिसरात आले. वाटेत ठिकठिकाणी आबालवृद्ध, युवा मंडळींना सेल्फी साठी पोस्ट देताना ते कुठेही थकले नाहीत.
राजवाड्यावरील विराट जनसमुदायाकडून अभिवादन स्वीकारून ‘सुरुची पॅलेस’ या आपल्या निवासस्थानाकडे मार्गस्थ झाले. रात्री दीड वाजता सुरूची मध्ये आगमन झाल्यानंतर त्याठिकाणीही कार्यकर्त्यांनी हारतुरे घेऊन त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती.
यावेळी श्री. छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी निवासस्थानी औक्षण करून त्यांचे स्वागत केले, तर सुपुत्र रुद्रनीलराजे व सुकन्या ऋणालीराजे यांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. सुपुत्राने चरण स्पर्श करून तर कन्येने मिठी मारून आपल्या वडिलांच्या मंत्रिपदाबद्दल आनंद व्यक्त केला. हा प्रसंग पाहून उपस्थित सारे जण भारावले व “बाबाराजे आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा उत्स्फूर्तपणे दिल्या.
दरम्यान, नागपूरपासून सातारपर्यंतच्या प्रवासात त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी सावलीप्रमाणे प्रवास केला. सलग १७ तास शुभेच्छांचा स्वीकार करताना, देवदर्शन करताना तसेच मिरवणुकीत सहभागी होताना, न थकता टवटवीतपणा दाखवणाऱ्या मंत्री बाबाराजेंच्या संयम, धैर्य या मानसिक प्रसन्नते बरोबरच, शारीरिक स्टॅमिन्याचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
You must be logged in to post a comment.