सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): अवयदानाच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत असणाऱ्या कोमल न्यू लाईफ फाऊंडेशन आता सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावा-गावात जाऊन अवयवदान आणि प्रत्यारोपण जनजागृती उपक्रम राबवणार आहे . जिल्हा आरोग्य विभाग ,राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत , जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने ‘कोमल न्यू लाईफ फाऊंडेशन’ हा उपक्रम राबवणार आहे.
कित्येक रुग्ण अवयव प्रत्यारोपनाबद्दल माहिती नसल्याने दगावत आहेत .त्याचबरोबर अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांना अवयवदान खूप कमी प्रमाणात असल्यामुळे अवयव मिळत नाहीत .म्हणूनच अवयवदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी अवयवदान जनजागृती होणे खूप महत्वाचे आहे .या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवयवदान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येईल .तसेच जे कोणी अवयवदानाची इच्छुक अशा लोकांची नोंदणी सुद्धा केली जाणार आहे. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या गावांमध्ये गरजू अवयव प्रत्यारोपण रुग्णांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
कोमल आणि अवयवदान चळवळ
एकाच वेळी हृदय व दोन्ही फुफुसांच्या प्रत्यारोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया जिच्यावर झाली ती साताऱ्याची कन्या कोमल पवार-गोडसे हे सर्वांना माहीत आहेच. अवयव प्रत्यारोपणाच्या माध्यमातून तिला पुनर्जन्म मिळाला होता, त्याप्रती ऋणी राहून, समाजामध्ये अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी कोमल व तिचे पती श्री. धीरज गोडसे यांनी या फाऊंडेशनची स्थापना केली. दि. १ सप्टेंबर २०२० रोजी कोमलने या जगाचा निरोप घेतला. पण तिने लावलेले हे फाऊंडेशनचे रोपटे आता मोठे होऊ लागले आहे. संस्थापक धीरज गोडसे यांनी हे कार्य तिच्या माघारी देखील तितक्याच जोमाने सुरु ठेवले आहे.आजतागायत मागील ५ वर्षात ३०० पेक्षा जास्त अवयवदान जनजागृती कार्यक्रम तसेच उपक्रम फाऊंडेशनमार्फत राबविण्यात आले असून भारत व भारताबाहेरील ३५०० पेक्षा जास्त रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सुमारे १० ते १५ वर्षांपूर्वी विशेषतः हृदयाचे प्रत्यारोपण ही गोष्ट भारतात तरी स्वप्नवत वाटत होती.मात्र आज ते सर्वत्र सहज शक्य आहे.पण त्यासाठी अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना वेळेत अवयव उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यापक जनजागृती हाच एक मार्ग आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी ‘कोमल न्यू लाईफ फाऊंडेशन’च्या चळवळीमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे.
अवयवदान ही एक चळवळ असुन त्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यामूळे अवयवदानाचे प्रमाण नक्कीच वाढेल.तसेच गरजू प्रत्यारोपण रुग्णांना नवीन आयुष्य देण्यामध्ये हातभार लागेल. केवळ हाच उद्देश समोर ठेऊन एक आदर्श अवयवदान जिल्हा म्हणून सातारा जिल्हा बनेल यासाठी कोमल न्यू लाईफ फाउंडेशनचा हा प्रयत्न आहे .
– धीरज गोडसे, अध्यक्ष,कोमल न्यू लाईफ फाऊंडेशन, सातारा.
You must be logged in to post a comment.