सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कमी दराच्या निविदा रद्द करून येथे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रकारांमध्ये सातारा नगरपालिकेचे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले आहे . पालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संगनमताने हा प्रकार केला असून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी लेखी तक्रार माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक अविनाश कदम यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
अविनाश कदम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा नगरपालिकेने 6 एप्रिल 2021 रोजी सातारा शहरातील तेरा रस्त्यांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. एका ठेकेदाराने प्रस्तुत दराच्या कमी किमतीने निविदा भरलेली असताना मी काम करू शकत नाही असे पत्र ठेकेदारांकडून घेण्यात आले. ही निविदा रद्द करताना सक्षम समितीची मंजुरी आणि शुद्धिपत्र करणे अपेक्षित असताना ही प्रक्रिया करण्यात आली नाही. या ठेकेदाराला काळया यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना या ठेकेदाराची दुसरी निविदा परस्पर उघडण्यात आली असून हा बेकायदेशीर प्रकार अधिकारी व पदाधिकारी संगनमताने झाला आहे. एकीकडे कमी दराने काम करणारे ठेकेदारांनी काम करायचे आणि दुसरीकडे ज्यांची काम करायची क्षमता नाही अशा ठेकेदारांच्या गळ्यात कामे मारायचे, असा विरोधाभास नगरपालिकेत सुरू आहे. या प्रकारात सातारा नगरपालिकेचे तब्बल पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी कदम यांनी केली आहे.या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, मुख्य सचिव, आयुक्त, नगरविकास मंत्री, नगरविकास राज्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचेही कदम यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सातारा शहरातील रस्त्यांची निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराने आपण काम करू शकत नसल्याचे पत्र त्यांच्या लेटरपॅडवर दिले आहे. मात्र निविदा प्रक्रियेत कोणत्याही स्वरूपाचा नियमाचा भंग झालेला नाही. सातारा शहरात दर्जेदार रस्ते व्हावेत यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा नगरपालिका सातत्याने आग्रही राहिली आहे.विकासकामे करतांना कोणतीही तडजोड केली जाणार नसून विरोधकांनी केलेल्या कोणत्याही प्रश्नाला आम्ही उत्तर देण्यास तयार आहोत.सातारा नगरपालिकेत असे कोणतेही काम चुकीचे झालेले नाही आणि होणारही नसल्याचे शेंडे यांनी यावेळी सांगितले.
You must be logged in to post a comment.