सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रशासनास सहकार्य करून गणेशोत्सव व ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.
साताऱ्यातील अलंकार समभागृहात सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, मुस्लीम बांधव व प्रशासकीय अधिकारी यांची शांतता समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, साताराचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण सूर्यवंशी यांच्या सह पोलीस दलातील अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी, मंडळांचे पदाधिकारी, मुस्लीम बांधव उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी प्रशासनाची भूमिका असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, सर्व मंडळांनी यंदाच्या वर्षी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवगळे उपक्रम राबवावे. जसे की मतदार नोंदणी कार्यक्रम, विविध शासकीय योजना याविषयी जनजागृती करावी. यामध्ये चांगले काम करणाऱ्या मंडळाचा प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात येईल. मंडळांनी पर्यावरण व प्रदूषण याविषयीही जनजागृती करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करावे व मंडळांनीही त्यास प्रोत्साहन द्यावे. मंडळांना लागणाऱ्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना तयार करावी. तसेच नगरपालीकेने लिंक तयार करून त्या माध्यमातून परवानग्या देण्याचे नियोजन करावे. विद्युत विभागाने विद्युत तारांचे सर्वेक्षण करून धोकादायक तारांची दुरुस्ती करणे, उंची वाढवणे ही कामे तातडीने करावीत. प्रांताधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर बैठका घेऊन सबंधित अधिकारी यांनी याविषयी सूचना देऊन १० दिवसांच्या आत ही कामे पूर्ण करून घ्यावीत व १० दिवसांनतर पुन्हा बैठक घेऊन झालेल्या कामांचा आढावा घ्यावा. राज्यात आदर्श असा गणेशोत्सव सातारा जिल्ह्यात साजरा करूया असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी केले.
पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, बैठकीमध्ये विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचनांवर नक्कीच निर्णय घेतले जातील. वर्गणी बाबत कोठे जबरदस्तीचे प्रकार घडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. मंडळांनी समाज कंटकांना मंडळांपासून दूर ठेवण्याची जबाबदारी घ्यावी. तसेच सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
You must be logged in to post a comment.