सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) कऱ्हाड तालुक्यातील काले येथील भैरोबाचा इनाम नावाच्या शिवारात ऊस व सोयाबीनच्या शेतात लावलेली पाच गांजाची झाडे पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. याप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.हिंदुराव गणपती पाटे (वय ६५, रा. काले) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर शाहूपुरी पोलिसांनी गडकरआळी परिसरात गांजाप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गांजा जप्त करण्यात आला असून याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काले येथील भैरोबाचा माळ नावच्या शिवारात एका शेतकऱ्याने सोयाबिनच्या शेतात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक रणजीत पाटील यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित शेतात छापा टाकून पाहणी केली. त्यावेळी त्या क्षेत्रात लहान मोठी अशी पाच गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त केली. त्याचे वजन १ हजार १६६ ग्रॅम होते. त्यानंतर पोलिसांनी हिंदुराव पाटे याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी शेडमध्ये वाळलेला ०.५५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला असून पोलिसांनी तोही जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत दोन हजार रूपये आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी फिर्याद दिली असून कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून हिंदुराव पाटे याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे तपास करीत आहेत.
याबाबत शाहूपुरी पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गुन्हे प्रकटीकरण शाखेला एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा लावला. त्यावेळी ताब्यात घेतलेल्या संबंधिताकडे जवळपास १० किलो गांजा आढळून आला. यावेळी गांजा विकत घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.
You must be logged in to post a comment.