साताऱ्यात डीजे–वाद्यांच्या गजरात बाप्पांचे आगमन

दोन मंडळांच्या मिरवणुकींनी शहर दणाणले; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्यात गणेश बाप्पांच्या आगमन मिरवणुकींचा जल्लोष रविवारी दोन प्रमुख मंडळांच्या मिरवणुकांनी सुरू झाला. बुधवार पेठेतील शिवतेज गणेशोत्सव मंडळ आणि मंगळवार पेठेतील जय महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळ यांनी पारंपारिक वाद्यांसह डीजेच्या गजरात मिरवणुकींना प्रारंभ केला. या मिरवणुकींमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी शहर वाहतूक शाखेने विशेष पथक कार्यरत ठेवले होते.

रविवार हा सातारकरांचा बाजाराचा दिवस असल्याने सायंकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होती. त्यातच मिरवणुकींमुळे अनेकांना मार्ग बदलावा लागला. राजवाडा बसस्थानकाजवळ दिवसभर डीजे व लाईटची मशिन उभी राहिल्याने एसटी बसेस लावण्यात अडचणी आल्या. गतवर्षी अशाच मिरवणुकींमुळे व्यापारी आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये वाद चिघळला होता. यंदा मंडईच्या राजाच्या मंडपात घेतलेल्या बैठकीनंतर नियमावली निश्चित करण्यात आली असली, तरी मिरवणुकींमुळे वाहतुकीवर परिणाम जाणवला.

शहरात शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे आणि वाहतूक शाखेचे निरीक्षक अभिजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथके सतर्क होती. शिवतेज मंडळ मिरवणूक बुधवार नाका, राजवाडा, मोती चौक, मारवाडी गल्ली, कमानी हौद मार्गे काढण्यात आली. तर जय महाराष्ट्र मंडळ मिरवणूक राजवाडा, गोलबाग, गोल मारुती मंदिर, समर्थ मंदिर मार्गे पार पडली.

श्रीमंत व्यापारी मंडळाची १५ ऑगस्टला भव्य आगमन मिरवणूक

शहरातील श्रीमंत व्यापारी मंडळाची आगमन मिरवणूक १५ ऑगस्टला काढण्यात येणार आहे. यामध्ये शिव-पार्वती विवाहाचा ४० कलाकारांचा थेट देखावा, भव्य डेकोरेशन, फटाक्यांची आतिषबाजी, संस्कार भारतीचा रांगोळी शो, शिवरुद्राक्ष वाद्यपथक कराड, क्रांती मंडळ नाशिक, पारंपारिक पोशाखातील महिला व कार्यकर्त्यांचा सहभाग, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा यांचा समावेश असेल. जुना मोटार स्टॅण्ड ते ५०१ पाटी दरम्यान ही मिरवणूक काढण्यात येणार असून, २५० लीड लाईटसह स्टेज शोचे आयोजन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!