सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शहर व हद्दवाढ परिसरातील गणेश विसर्जनासाठी नगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. मोठ्या मूर्तीसाठी बुधवार नाक्यावर ३५ फूट खोल कृत्रिम तळे उभारण्यात आले असून, त्यामध्ये सुमारे ३ कोटी २० लाख लिटर पाणी साठवण्यात आले आहे. गणेश विसर्जनासाठी १०० मेट्रिक टनी महाकाय क्रेनही दाखल होणार असून या तयारीची पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात येत आहे. शनिवार व रविवारी विसर्जन होणार असल्याने मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे.
मार्गावरील खड्डे भरुन घेण्यात आले आहेत. गणेश विसर्जन कामाची नुकतीच पाहणी नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, सभापती सीता हादगे, स्नेहा नलावडे, नगर अभियंता दिलीप चित्रे व पदाधिकाऱ्यांनी केली.
गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली आहे. नगरपालिकेने जाहीर केलेल्या कृत्रिम तळ्यांमध्येच नागरिकांनी गणेश विसर्जन करावे. गणेश भक्तांनी गैरसोय टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.
– दिलीप चित्रे
नगर अभियंता, सातारा पालिका
You must be logged in to post a comment.