किराणा माल, खाद्य पदार्थ दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच राहणार सुरू ; प्रशासनाचा नवा आदेश

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून नवे आदेश काढण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार आता किराणा दुकाने, भाजीपाला मार्केट, डेअरी, बेकरी, यांच्यासह सर्व खाद्य पदार्थांची दुकाने, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने स्टॉल, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणा-या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने, सकाळी 7 ते 11 या कालावधीतच चालू ठेवण्यास मूभा देण्यात आली आहे. मात्र दुकानदारांना सायंकाळी 5 पर्यंत घरपोच सेवा देण्याची परवानगी असणार आहे.

नव्या आदेशानुसार मेडिकल दुकाने ही सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहेत. हॉस्पीटलमधील मेडिकल दुकाने मात्र पुर्णवेळ चालू राहतील. याचबरोबर वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके यांच्या वितरणाला देखील सकाळी 7 ते 11 याचवेळेत परवानगी देण्यात आली आहे.या आदेशांची अंमलबजावणी आज रात्रीपासून ते 1 मे पर्यंत असणार आहे.

मद्य घरपोच भेटणार…!

सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दारू दुकानातून घरपोच मद्य विक्री करण्यास परवानी देण्यात आली आहे. मात्र ग्राहकाला दारूच्या दुकानात येऊन दारू खरेदी करण्यास नव्या आदेशानुसार मनाई असणार आहे. दरम्यान कोणी निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
 

error: Content is protected !!