सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ऐतिहासिक शहर म्हणून साताऱ्याची ओळख आहे. हे शहर डोंगराच्या लगत असल्याने शहरात अनेक ठिकाणी छोटे-मोठे नैसर्गिक ओढे आहेत. मात्र, शहरातील काही धनदांडग्यांनी या ओढ्यांवर अतिक्रमण करून स्वतःचे बंगले उभारले असून सध्या सदर बझार या उच्चभ्रू वस्तीमध्ये अशाच एका ओढ्यात कचरा टाकून या ओढ्याचे पात्र मुजण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
सदरबझार येथील बंड प्लाझा समोरील रस्त्यावर असणाऱ्या ब्रिटिश कालीन पुलावरून काही नागरिक रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन घरगुती व दुकानातील कचरा ओढ्याच्या पात्रात टाकतात . कचरा एवढ्या मोठ्या प्रमाणात टाकला आहे की ओढ्याचे एकाबाजूचे पात्र संपूर्णपणे मुजुन गेले आहे. त्यामुळे ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा फुगवटा दुसऱ्या बाजूला तयार झाला असुन सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या पाण्यामुळे डासांचे प्रमाण या भागात वाढले असुन मलेरिया , डेंग्यू या सारखे आजार बळावत आहेत .
या भागात नित्यनियमाने घंटा गाडी फिरते परंतु नागरिक कचरा घंटा गाडीत टाकण्याऐवजी पुलावरून थेट ओढ्यात टाकतात. नागरिकांच्या म्हणण्यानुसार घंटा गाडी सकाळी लवकर येते त्यामुळे लवकर कचरा टाकण्यास जमत नाही. त्यामुळे नागरिक पर्याय म्हणून कचरा हा येथे टाकतात. काही नागरिक दुकानातील कचरा हा रातोरात अंधाराचा फायदा घेऊन मोठ मोठ्या गाडीतुन येथे टाकतात. काही सुजाण नागरिकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला पण हे लोक गाडीतुन लगेच कचरा टाकुन पलायन करतात. या सर्व प्रकारामुळे आता पाणी साठून त्यात डासांची पैदास झाली असुन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वेळीच नगरपालिका प्रशासनाने लक्ष घालुन ओढ्याचे पात्र स्वच्छ करावे व कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी आजूबाजूच्या नागरिकांकडून मागणी होत आहे .
You must be logged in to post a comment.