ख्यातनाम साहित्यिक आ.ह.साळुंखे यांच्या सन्मानार्थ गज़लनवाज भीमराव पांचाळेंची साताऱ्यात मैफिल

सातारा, (भूमिशिल्प वृत्तेसवा) : जागतिक कीर्तीचे ख्यातनाम साहित्यिक प्राच्यविद्यापंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या ८० व्या जन्मदिनाच्या सन्मानार्थ शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी सातारा येथे ख्यातनाम गज़लकार भीमराव पांचाळे व डॉ. भाग्यश्री पांचाळे यांची गज़लमैफिल होत आहे.

प्राचीन संंस्कृतीचे उत्खनन करून लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून डॉ. आ. ह. यांनी खरा इतिहास – संस्कृती भारतीय समाजापुढे आणण्याचे ऐतिहासिक कार्य आहे. आ. ह. यांच्या या एकूणच योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या आगळ्यावेगळ्या मैफिलीचे आयोजन साधना साहित्यिक व सांस्कृतिक मंच सातारा, यांनी केले असल्याची माहिती मंचचे अध्यक्ष व कवी, गज़लकार वसंत शिंदे व गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी दिली.

भारतीय समाजाला सामाजिक, सांंस्कृतिक दिशादिग्दर्शन करण्याचे मूलभूत स्वरुपाचे कार्य डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आयुष्यभर केले आहे. त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रम होत आहेत. डॉ. आ. ह. साळुंखे यांची जी कर्मभूमी आहे, त्या साताऱ्यात त्यांचा यथोचित सन्मान सोहळा व्हावा या उद्देशाने आतापर्यंत विविध उपक्रम राबविले आहेत.

नुकताच ग्रंथतुला आणि ग्रंथाचे भव्य स्वरुपात वितरण हा सोहळाही साधना साहित्यिक व सांस्कृतिक मंचने यशस्वी करून दाखवला. आता गज़लनवाझ भीमराव पांचाळे यांच्या मैफिलीचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी या आगळ्यावेगळ्या मैफिलीला स्वतः डॉ. आ. ह. साळुंखे असणार असून छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

आ. ह. यांच्या ८० व्या जन्मदिनाच्या निमित्ताने होणारी भीमराव पांचाळे यांची ही गज़लमैफिल केवळ आ. ह. प्रेमींनाच नव्हेतर तमाम सातारकरांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे आ. ह. साळुंखे यांच्या चाहत्यांनी व गज़लप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कवी – गज़लकार वसंत शिंदे तसेच साधना मंच व आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!