पाटण येथील अल्पवयीन पीडितेला न्याय द्यावा ; वंचित बहुजन आघाडीची गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : पाटण येथील ढेबेवाडी खोऱ्यातील रवले सुतारवाडी गावातील चिमुरडी अबोलीला न्याय मिळावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन देऊन करण्यात आली.

निवेदनात म्हटले की, पाटण सुतारवाडी येथील चिमुरडी अबोली हिच्यावर अतिप्रसंग करून तिचा निर्घुन खून आला. घडलेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी , हृदय पिळवटून टाकणारी आहे. राज्यामध्ये सर्व स्तरातून या घटनेचा निषेध होत आहे.संपूर्ण राज्यामध्ये घडलेल्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.लोकांना आपल्या पाल्याबद्दल काळजी वाटू लागली आहे.महाराष्ट्र राज्याची गृह विभागाची जबाबदारी असणाऱ्या गृहराज्यमंत्री यांच्या मतदारसंघातच जर अशा घटना घडत असतील तर राज्यातील मुली सुरक्षित आहेत का ? असा सवाल या निमित्ताने लोकांना पडू लागला.

महाराष्ट्राला पुरोगामी चळवळीची परंपरा आहे फुले , शाहू ,आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अश्या घटना घडणे म्हणजे भारत देशात महाराष्ट्र राज्याची मान शरमेने खाली जाणे होय.
वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीने आम्ही घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो.निवेदनात मागण्या करण्यात आल्या आहेत.
सदर घटनेचा तपास उच्च स्तरीय डीवायएसपी दर्जाच्या महिला अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात यावा. सदर केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावी. सदर केससाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी ,महाराष्ट्रातील तज्ञ वकील उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी. सदर केस मध्ये नव्याने तयार करण्यात आलेला शक्ती कायदा नुसार आरोपीस फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पीडित कुटुंबाला तात्काळ १०,००,०००/- दहा लाख रु आर्थिक संरक्षण मिळावे. तरी वरील मागण्यांचा गांभीर्याने विचार होऊन सदर पीडित कुटुंबास न्याय द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, गणेश भिसे, सतीश कांबळे, संदिप कांबळे, दीपक चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!