शासकीय यंत्रणांनी फिल्डवर उतरून काम करावे : पालकमंत्री शंभूराज देसाई

पालकमंत्र्यांनी पाटण तालुक्यातील अतिवृष्टीचा आढावा घेत दिले निर्देश

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): पाटण तालुक्यात पावसाचे प्रमाण खूप आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पाटण पंचायत समिती कार्यालयातील लोकनेते बाळासाहेब देसाई भवनात झालेल्या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाने आपत्तीच्या काळात अलर्ट मोडवर काम करावे,अशा सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पाटण तालुक्यातील भूस्खलन व दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करावे. त्यांची शाळा, महाविद्यालयांमध्ये राहण्याच्या सोयी बरोबर जेवणाची, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. ग्रामसेवक, तलाठी व कोतवाल यांनी आपत्तीच्या काळात आपल्या कार्यक्षेत्रातच राहावे.पाटण तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांनी शाळा सुटल्यानंतर मुले सुरक्षितपणे घरी पोहोचल्यानंतरच शाळेतून बाहेर पडावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.

पाटण तालुक्यातील कुठल्याही गावातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता महावितरणने घ्यावी. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या ठिकाणीच राहावे. कृषी विभागाने कृषी क्षेत्राचे तसेच शेत जमिनीचे नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावे व त्याचा अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर करावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री.देसाई यांनी बैठकीत दिल्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पाटण तालुक्यात चाळीस हजार लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. या योजनेत पाटण प्रशासनाने चांगले काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.

error: Content is protected !!